शिवाजी पार्कवर शिवसेनाप्रमुखांच्या अंत्यसंस्कारासाठी बांधण्यात आलेला तात्पुरता चौथरा हटविण्याबाबत पालिका प्रशासनाकडून आलेल्या नोटिशीनंतर, मुंबईतील इतर अनधिकृत बांधकामे पालिका आयुक्तानी अगोदर हटवावीत असा नवा पवित्रा महापौर सुनील प्रमभू यांनी घेतला आहे. शिवसेनाप्रमुखांवर अंत्यसंस्कार झाले ती जागा शिवसैनिकांसाठी पवित्र स्थान आहे आणि त्याचे पावित्र्य राखले गेलेच पाहिजे, यावरही महापौर ठाम आहेत.
शिवाजी पार्कवर अंत्यसंस्कारांसाठी उभारण्यात आलेला चौथरा ताबडतोब हटवावा, अशी नोटीस महापौर सुनील प्रभू आणि शिवसेना खासदार संजय राऊत यांना मुंबई महापालिकेने बजावल्यानंतर महापौरांनी आता भावनिक राजकारण करायला सुरुवात केली आहे. अंत्यसंस्कारांसाठी उभारण्यात आलेला चौथरा कधी हटवणार, या प्रश्नावर कोणतेही ठोस उत्तर न देता, ‘ते पवित्र स्थान आहे आणि त्याचे पावित्र्य राखले गेले पाहिजे’ एवढय़ाच मुद्दय़ावर महापौर वारंवार भर देत राहिले.
शिवाजी पार्कवर अंत्यसंस्कारांसाठी बांधलेल्या चौथऱ्याची जागा सोडायची शिवसेनेची तयारी नाही. त्यामुळे महापालिका आयुक्तांनी नोटीस बजावली असून त्यावर तुमची काय भूमिका आहे, चौथरा हटवणार का आदी प्रश्नांना बगल देत ‘हे ठिकाण लाखो लोकांचे श्रध्दास्थान बनले आहे. त्याचे पावित्र्य राखले गेले पाहिजे. यासंदर्भातील निर्णय वरिष्ठ घेतील’, असे गोलमाल उत्तर महापौरांनी दिले. आश्चर्याची बाब म्हणजे चौथरा अनाधिकृत असण्याबाबत विचारले असता, आयुक्तांनी पहिल्यांदा मुंबईतील अनधिकृत बांधकामे हटवावी, असा सल्लाही आयुक्तांना दिला. त्यावर अनधिकृत बांधकामे हटवण्याची जबाबदारी काय फक्त आयुक्तांचीच आहे का? ती महापौरांची नाही का? असे विचारले असता महापौरांनी फक्त एकच घोषा लावला, ‘आमची भूमिका पवित्र स्थळाबाबत आहे. त्याचे पावित्र्य राखले गेले पाहिजे.’   

Story img Loader