पालिका आयुक्तांविरुद्ध मनसेने सादर केलेल्या अविश्वास ठरावाच्या पत्रात कायदेशीर बाबींची पूर्तता करण्यात आलेली नसल्याच्या कारणावरून महापौरांनी या पत्राला केराची टोपली दाखविली आहे.
खड्डेमय रस्ते, साचणारे कचऱ्याचे ढिग, डेंग्युच्या साथीचा प्रादुर्भाव, अपुरा आणि दुषित पाणीपुरवठा आदी विविध प्रश्न सोडविण्यात आयुक्त कुंटे असमर्थ ठरले आहेत. त्यामुळे मनसेचे गटनेते संदीप देशपांडे यांनी सीताराम कुंटे यांच्याविरुद्ध अविश्वास ठराव दाखल करण्याचा निर्णय घेतला आहे. त्याबाबतचे पत्र त्यांनी महापौर सुनील प्रभू यांच्याकडे सादरही केले आहे. या पत्राबाबत पत्रकारांशी बोलताना सुनील प्रभू म्हणाले की, महापालिका अधिनियमानुसार अविश्वास ठराव सादर करावा लागतो. याबाबतच्या पत्रावर स्थायी समितीच्या चार सदस्यांच्या स्वाक्षऱ्या असाव्या लागतात. तसेच पाचअष्ठमांश बहुमताचीही गरज असते.
संदीप देशपांडे यांनी सादर केलेल्या पत्रावर स्थायी समितीच्या चार सदस्यांच्या स्वाक्षऱ्या नाहीत. तसेच ठरावाच्या सूचनेद्वारे अविश्वास ठराव मांडता येत नाही. नियमाने ही ठरावाची सूचना होऊच शकत नाही. त्यामुळे हे पत्र बाद करण्यात आले आहे, असे सुनील प्रभू यांनी स्पष्ट केले. अविश्वास ठरावाचे पत्र महापौरांनी बाद ठरविल्यामुळे गटनेतेपदी निवड झालेल्या संदीप देशपांडे यांना फटका बसला आहे.