मुंबईसह राज्यात डेंग्यूने रुग्ण मृत्युमुखी पडत असताना ‘डेंग्यू हा साधा आजार आहे, प्रसारमाध्यमांनीच त्याला मोठा करून भयंकर आजाराचे रूप दिले आहे. नागरिकही योग्य ती काळजी घेत नाहीत,’ अशी मुक्ताफळे महापौर स्नेहल आंबेकर यांनी मंगळवारी राजावाडी रुग्णालयात डेंग्यूग्रस्तांची ‘विचारपूस’ करतानाच उधळल्याने महापौरांच्या या ‘डंखा’ने रुग्ण आणि त्यांचे आप्तही संतप्त झाले. या मुक्ताफळांवरून वाद उद्भवताच महापौरांनी नंतर सपशेल माफी मागितली.
‘बडे बडे शहरों में छोटी छोटी बाते होती है..’ असे विधान २६ नोव्हेंबरच्या हल्ल्यानंतर तत्कालीन गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी केले होते. त्या विधानाची आठवण महापौर आंबेकरांच्या या असंवेदनशील विधानाने करून दिली आहे. नोव्हेंबरच्या पहिल्या आठवडय़ात तापमान कमी होऊनही डेंग्यूच्या रुग्णांची संख्या कमी झालेली नाही. त्यातच नोव्हेंबरच्या पहिल्याच आठवडय़ात चार मृत्यू झाल्याने नागरिक घाबरले आहेत. गेल्या वर्षी डेंग्यूमुळे ११ मृत्यू झाले होते. यावर्षी आतापर्यंत डेंग्यूमुळे १२ मृत्यू झाले आहेत. डासांना मारण्यासाठी पालिका वापरत असलेले किटकनाशकही कुचकामी असल्याचा आरोप भाजपच्या गटनेत्यांनी केला आहे. पालिका रुग्णालयातील डॉक्टरही डेंग्यूमुळे आजारी पडले आहेत. डेंग्यूच्या रुग्णांनी वॉर्ड भरले आहेत. या पाश्र्वभूमीवर लोकांमध्ये या आजाराविषयी आधीच घबराट पसरली असताना महापौरांनी अशी विधाने केल्याने संतप्त प्रतिक्रिया उमटली आहे.
मंगळवारी केईएम तसेच राजावाडी रुग्णालयात पाहणी करायला गेलेल्या महापौरांनी त्यानंतर प्रसारमाध्यमांसमोरच तोंडसुख घेतले. डेंग्यूची काळजी करण्याचे कारण नाही. डेंग्यू पसरवणारे डास घरातच अंडी देतात. मात्र नागरिक काळजी घेत नसल्याने डास वाढल्याचे सांगत महापौर आंबेकर यांनी महापालिकेची जबाबदारी झटकण्याचा प्रयत्न केला, मात्र, या विधानावर वादंग होताच आपण अनावधानाने ते विधान केल्याचे सांगत आंबेकर यांनी नंतर माफी मागितली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

डेंग्यू हा साधा आजार आहे. त्याची काळजी करण्याचे कारण नाही. मात्र सतत बातम्या देऊन प्रसारमाध्यमेच लोकांमध्ये घबराट पसरवत आहेत.
स्नेहल आंबेकर, महापौर