महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनी अधिकृतरीत्या शिवाजी पार्कमधील महापौर निवास सोडले. त्यांनी आज अधिकृतरीत्या महापौर बंगल्याचा ताबा सोडला आणि ते भायखळ्यातील राणीच्या बागेतील सरकारी बंगल्यात राहायला गेले. त्यामुळे आता बाळासाहेब ठाकरे यांचे स्मारक शिवाजी पार्कात उभे राहण्यातील आणखी एक अडथळा दूर झाला आहे.
या संदर्भात महापौर बंगल्यात काल एक बैठक झाली. या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, पालिका आयुक्त अजॉय मेहता आणि शिवसेनेचे काही नेते या बैठकीला उपस्थित होते. त्यानुसार महाडेश्वर यांनी महापौर बंगल्यावरील ताबा सोडला.
महापौर बंगल्यात बाळासाहेब ठाकरे यांचे स्मारक व्हावे, यावरून चर्चा रंगू लागल्यापासून याबाबत सर्व स्तरातून मिश्र प्रतिक्रिया येत आहेत. यात भर म्हणून आज मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी एक खोचक ट्विट केले आहे. मुंबईचे महापौर राणीच्या बागेत वास्तव्यास आले आहेत. त्यामुळे आत राणीच्या बागेत येणाऱ्यांची संख्या वाढेल आणि त्यामुळे उत्पन्नातही भर पडेल, अशा आशयाचे ट्विट त्यांनी केले आहे.
चला एक बर झालं राणीच्या बागेचे उत्पन्न वाढेल लहान मुलांना पेंग्विन बरोबर महापौर पण बघायला मिळतील
— Sandeep Deshpande (@SandeepDadarMNS) November 1, 2018
दरम्यान, याबाबत शिवसेनेकडून किंवा महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांच्याकडून कोणत्याही प्रकारची प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही.