मुंबई : पहिली पत्नी करुणा मुंडे यांना दर महिन्याला दोन लाख रुपयांचा देखभाल खर्च देण्याच्या वांद्रे न्यायालयाच्या अंतरिम आदेशाविरोधात माजी मंत्री धनंजय मुंडे यांनी केलेले अपील शनिवारी माझगाव सत्र न्यायालयाने फेटाळले. करूणा यांना दिलासा देणारा वांद्रे न्यायालयाचा निर्णय सत्र न्यायालयाने कायम ठेवला.अतिरिक्त सत्र न्यायाधीश शेख अकबर शेख जफर यांनी धनंजय मुंडे यांनी वांद्रे न्यायालयाच्या अंतरिम आदेशाविरोधात केलेले अपील फेटाळले, वांद्रे दंडाधिकारी न्यायालयाने ४ फेब्रुवारी रोजी करुणा यांच्या अर्जावर अंतरिम आदेश देताना मुंडे यांना घरगुती हिंसाचाराच्या आरोपांतर्गत सकृतदर्शनी दोषी ठरवले होते.
तसेच, करूणा यांना दरमहा सव्वा लाख रूपये, तर त्यांच्या दरमहा ७५ हजार अंतरिम देखभाल खर्च देण्याचे अंतरिम आदेश दिले होते. या निर्णयाविरोधात मुंडे यांनी सत्र न्यायालयात धाव घेतली होती. तर, देखभाल खर्चाची रक्कम नऊ लाख रुपयांपर्यंत वाढवून देण्याच्या मागणीसाठी करूणा यांनीही सत्र न्यायालयात अर्ज केला होता.
दंडाधिकाऱ्यांनी अंतरिम देखभाल खर्चाचा दिलेला आदेश चुकीचा असल्याचा दावा मुंडे यांनी अपीलात केला होता. तसेच, करूणा यांच्याशी कधीही लग्न केले नव्हते. किंबहुना, त्यांची ओळख एका राजकीय पक्षाच्या बैठकीदरम्यान झाली होती आणि त्यांच्या वारंवार होणाऱ्या भेटीगाठींमुळे वैयक्तिक संबंध निर्माण झाले होते. त्यानंतर, दोघांनी परस्पर सहमतीने संबंध पुढे नेण्याचा निर्णय घेतला. या नात्यातून दोन मुले झाली आणि मुलांच्या अधिकृत कागदपत्रांसाठी आपण आपले नाव आणि आडनाव वापरण्याची परवानगी दिल्याचा दावाही मुंडे यांनी केला होता. शिवाय, करूणा यांना आपण आधीपासूनच विवाहित असल्याची माहिती होती. त्यानंतरही त्यांनी आपल्याशी संबंध पुढे सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला.
तथापि, २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत आमदार म्हणून निवडून आल्यानंतर, राज्य मंत्रिमंडळात समाविष्ट झाल्यानंतर आणि पत्नी राजश्री मुंडे यांच्यासह मुंबईतील अधिकृत निवासस्थानी राहू लागल्यानंतर करूणा यांच्या वर्तनात बदल झाल्याचा दावाही मुंडे यांनी अपिलात केला होता. याशिवाय, करूणा आणि त्यांच्या कुटुंबीयांनी विविध सबबीखाली आपल्याकडे मोठ्या रकमेची वारंवार आणि अवास्तव मागणी करण्यास सुरुवात केली. त्यानंतर, करुणा यांनी करूण धनंजय मुंडे नावाने समाजमाध्यम खाते तयार करून आपली पत्नी असल्याचे भासवले. परंतु, आपण कधीही करूणा यांच्या लग्न केले नाही. याउलट, राजश्री मुंडे यांच्याशी आपला कायदेशीर विवाह झाला होता, असेही मुंडे यांनी अपीलात म्हटले होते.
वांद्रे न्यायालयाचा निर्णय काय होता ?
करूणा आणि त्यांच्या दोन मुलांना धनंजय मुंडें यांनी २०१८ पासून दुर्लक्षित केल्याचे निरीक्षण वांद्रे दंडाधिकाऱ्यांनी करूणा यांचा आरोप योग्य ठरवताना नोदवले होते. करूणा यांनी मुंडे यांच्याविरोधात केलेल्या आरोपांचे आणि दाव्यांचे समर्थन करणारे सकृतदर्शनी पुरावे आहेत. शिवाय, मुंडे यांनी निवडणूक आयोगाकडे सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रासह अन्य कागदपत्रांचा विचार करता कपूणा या त्यांची पत्नी म्हणून ओळखल्या जातात हे स्पष्ट होते, असेही दंडाधिकाऱ्यांनी आदेशात नमूद केले होते. मुंडे यांनी करूणा यांच्याशी असलेला वैवाहिक दर्जा नाकारला. त्यामुळे, करूणा याच्यावर भावनिक अत्याचार होत असून तो घरगुती हिंसाचारच असल्याचे न्यायालायने करूणा यांना अंतरिम दिलासा देताना नमूद केले होते. तसेच करूणा यांना अर्जाच्या खर्चापोटी २५,००० रुपये भरपाई देण्याचे आदेशही मुंडे यांना दिले होते. त्याचवेळी, करूणा यांना झालेला भावनिक त्रास आणि त्यांच्या आर्थिक गरजा लक्षात घेऊन त्यांच्यासह त्यांच्या अल्पवयीन मुलीला देखभाल खर्च देण्याचा अंतरिम आदेश दिला होता. या प्रकरणी अंतिम निकालापर्यंत करूणा यांना देखभाल खर्च म्हणून दरमहा १.२५ लाख आणि त्यांच्या मुलीला दरमहा ७५ हजार देखभाल खर्च देण्य़ाचेही न्यायालयाने स्पष्ट केले होते.