मुंबई : मुंबईच्या हवेतील नायट्रोजन डायऑक्साइडची पातळी वाढत असून , माझगाव आणि वांद्रे-कुर्ला संकुल या भागातील नायट्रोजन डायऑक्साइडच्या पातळीत सर्वाधिक वाढ झाली आहे. शहरातील हवेत २०२३ मध्ये सरासरीपेक्षा जास्त नायट्रोजन डायऑक्साइडचे प्रमाण होते.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

‘ग्रीनपीस इंडिया’ या संस्थेने २०१९ ते २०२३ मध्ये मुंबई, दिल्ली, बंगळुरू, हैदराबाद, चेन्नई आणि कोलकाता या शहरांतील हवेच्या गुणवत्तेचा अभ्यास केला. कृत्रिम उपग्रहाद्वारे केलेल्या निरिक्षणानुसार मुंबईच्या हवेतील नायट्रोजन डायऑक्साइडच्या पातळीत सरासरीपेक्षा अधिक वाढ झाल्याचे अभ्यासादरम्यान निदर्शनास आले. नायट्रोजन डायऑक्साइडच्या पातळी वाढलेल्या भागांच्या यादीत पहिल्या क्रमांकावर माझगाव, तर दुसऱ्या क्रमांकावर वांद्रे-कुर्ला संकुल आहे. माझगाव येथे दैनंदिन सरासरीपेक्षा नायट्रोजन डायऑक्साइडचे प्रमाण ७० टक्क्यांनी वाढले आहे. त्यामुळे या भागात राहणाऱ्या नागरिकांच्या आरोग्याबद्दल अभ्यासात चिंता व्यक्त करण्यात आली आहे.

हेही वाचा >>> म्हाडा कोकण मंडळ सोडत २०२४ : २२६४ घरांच्या सोडतीला अखेर १५ दिवसांची मुदतवाढ, २५ डिसेंबरपर्यंत अर्जविक्री-स्वीकृती प्रक्रिया

नायट्रोजन डायऑक्साइडमुळे हवा प्रदूषित होत असून यामुळे श्वसन, मेंदू आणि रक्ताभिसरण याविषयीच्या समस्या उद््भवतात. वाहने, वीजनिर्मिती आणि इतर औद्योगिक प्रक्रिया कोळसा, तेल, वायू यांसारख्या जीवाश्म इंधनांवर अवलंबून असल्याने यातून नायट्रोजन डायऑक्साइडचे उत्सर्जन होते. २०१९ मध्ये टाळेबंदी असल्याने मोठ्या प्रमाणावर वाहने आणि उद्योगधंदे बंद होते. याउलट २०२१ मध्ये टाळेबंदी शिथिल झाल्याने वाहने व उद्योगधंदे पुन्हा सुरू झाले. परिणामी, हवेतील नायट्रोजन डायऑक्साइडचे प्रमाण वाढले. दरम्यान, वायू प्रदूषण केवळ दिल्लीपुरते मर्यादित न राहता भारतातील सर्व शहरांमध्ये नायट्रोजन डायऑक्साइडची पातळी वाढत असल्याचे अहवालात नमुद करण्यात आले आहे. वाढते शहरीकरण, वाहनांची वाढती संख्या आणि इंधनांचा अधिक वापर ही यामागील मुख्य कारणे आहेत.

खासगी वाहनांच्या संख्येला आळा घालणे, किमान प्रदूषण करणारी वाहतूक यंत्रणा राबवणे, सायकल चालविण्यासाठी पायाभूत सुविधा निर्माण करणे. तसेच सार्वजनिक परिवहन सेवेला चालना देण्याची गरज आहे. – भगवान केसभट, संस्थापक, ‘वातावरण’ संस्था

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mazgaon bkc among most polluted areas due to nitrogen dioxide levels increase mumbai print news zws