परीक्षांच्या तारखेत बदल करा; ‘मस्ट’ संघटनेची मुंबई विद्यापीठाकडे मागणी
मुंबई : राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षामार्फत (सीईटी कक्ष) १, २ आणि ३ एप्रिल रोजी ‘एमबीए’ आणि ‘एमएमएस’ अभ्यासक्रमासाठीची प्रवेश परीक्षा घेण्यात येत आहे. मात्र या कालावधीत मुंबई विद्यापीठाची उन्हाळी सत्र परीक्षाही होत आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये न यासाठी विद्यापीठाने या तारखांच्या परीक्षा नंतर घ्याव्यात, अशी मागणी महाराष्ट्र धर्मनिरपेक्ष शिक्षक संघटनेने (मस्ट) केली आहे.
मुंबई विद्यापीठाच्या शैक्षणिक वर्ष २०२४-२५ अंतर्गतच्या उन्हाळी सत्रातील विविध अभ्यासक्रमांच्या परीक्षांना सुरुवात झाली आहे. तर दुसरीकडे सीईटी कक्षामार्फत १, २ आणि ३ एप्रिल रोजी ‘एमबीए’ आणि ‘एमएमएस’ अभ्यासक्रमासाठीची प्रवेश परीक्षा घेण्यात येत आहे. दरवर्षी मुंबई विद्यापीठाचे बहुसंख्य विद्यार्थी हे ‘एमबीए’ अभ्यासक्रमासाठीची प्रवेश परीक्षा देत असतात. या दोन्ही परीक्षा एकाच दिवशी असल्यामुळे विद्यार्थ्यांची कोंडी झाली असून गोंधळाचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे मुंबई विद्यापीठाने उन्हाळी सत्रातील १, २ आणि ३ एप्रिल रोजी होणाऱ्या परीक्षा अन्य दिवशी घ्याव्यात, अशी मागणी ‘मस्ट’ संघटनेने केली आहे.
‘मुंबई विद्यापीठाची उन्हाळी सत्र परीक्षा आणि ‘एमबीए’ व ‘एमएमएस’ सीईटी एकाच दिवशी असल्यामुळे बहुसंख्य विद्यार्थी हे सीईटीपासून वंचित राहू शकतात. त्यामुळे मुंबई विद्यापीठाने संबंधित परीक्षांच्या सुधारित तारखा जाहीर कराव्यात. ‘सीईटी’चे वेळापत्रक विचारतात घेऊन परीक्षेचे वेळापत्रक तयार करावे. तसेच विद्यापीठाने उन्हाळी सत्रातील काही अभ्यासक्रमांच्या विविध विषयांच्या परीक्षांमध्ये अंतर ठेवले आहे.
मात्र रसायनशास्त्र अभ्यासक्रमाची परीक्षा सलग चार दिवस ठेवली आहे. विद्यार्थ्यांना अभ्यासाला पुरेसा वेळ मिळण्यासाठी या परीक्षांमध्ये अंतर ठेवावे. या दोन्ही विषयांसंदर्भात मुंबई विद्यापीठाच्या परीक्षा व मूल्यमापन मंडळाच्या संचालकांना पत्र देऊन विद्यार्थीहिताचा निर्णय घेण्याची मागणी केली आहे’, असे ‘मस्ट’ संघटनेचे अध्यक्ष आणि अधिसभा सदस्य डॉ. विजय पवार यांनी सांगितले.
काही परीक्षांच्या तारखांमध्ये बदल; सुधारित वेळापत्रक लवकरच : मुंबई विद्यापीठ
राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाच्या वेळापत्रकानुसार मुंबई विद्यापीठाच्या उन्हाळी सत्रातील काही परीक्षांच्या तारखांमध्ये बदल करण्यात आला आहे. सदर परीक्षांचे सविस्तर सुधारित वेळापत्रक mu.ac.in या अधिकृत संकेतस्थळावर लवकरच प्रसिद्ध करण्यात येईल, असे मुंबई विद्यापीठ प्रशासनाने स्पष्ट केले.