मुंबई क्रिकेट संघटनेची (एमसीए) बहुचर्चित त्रैवार्षिक निवडणूक आज पार पडत आहे. अध्यक्षपदासाठी शरद पवार-आशीष शेलार गटाचे उमेदवार अमोल काळे आणि मुंबई क्रिकेट गटाचे उमेदवार माजी क्रिकेटपटू संदीप पाटील यांच्यात चुरस पाहायला मिळणार आहे. याच निवडणुकीच्या पूर्वसंध्येला आयोजित करण्यात आलेल्या स्नेहभोजन समारंभात राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार एकाच मंचावर दिसून आले. यावेळी तिन्ही नेत्यांनी जोरदार शाब्दिक फटकेबाजी केल्याचं चित्र पहायला मिळालं. शरद पवार यांनी आपली पत्नी शिंदे कुटुंबातील असल्याचं मुख्यमंत्री शिंदे शेजारी बसलेले असतानाच सांगितलं. आपण शिंदेंचे जावई असल्याच्या पवारांच्या विधानावर फडणवीस यांनी अगदी जशात तसं उत्तर दिलं.

नक्की वाचा >> ‘मी, फडणवीस, पवार एकत्र असल्यानं काही जणांची…”; पवार अन् फडणवीसांच्या मध्ये उभं राहून भाषण देताना CM शिंदेंचा ठाकरेंना टोला

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

शरद पवार यांनी आपल्या छोटेखानी भाषणामध्ये सासर हे शिंदे होते आणि ते उत्तम क्रिकेटर होते असा संदर्भ मिश्कीलपणे दिला. आपल्या सासऱ्यांचं अडनाव शिंदे होतं असं पवारांनी सांगितलं. बाजूलाच बसलेल्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडे पाहत शिंदेंनी आपल्या जावयाची काळजी घ्यावी असंही पवारांनी म्हटलं. यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही तितक्याच मिश्कीलपणे आपल्या भाषणाला सुरुवात करताना उत्तर दिलं.

“माझे सासरे शिंदे होते,” असं पवारांनी हातवारे करुन म्हणताच सभागृहात एकच हशा पिकला. पुढे पवारांनी, “(माझे सासरे) नुसते शिंदे नव्हते तर क्रिकेटर होते,” असं म्हणत क्रिकेटसंदर्भातील या कार्यक्रमात सासऱ्यांचा उल्लेख करण्यामागील संदर्भ पवारांनी अधोरेखित केला. “शिंदेंची मुलगी पवारांची बायको आहे. त्यामुळे शिंदेंनी आपल्या मुलीची काळजी नीट घेण्यासाठी जावयाच्या ज्या काही सूचना असतील त्याचा गांभीर्याने विचार करावा, अशी विनंती करतो,” असं पवार म्हणाले. या टोलेबाजीला सभागृहात उपस्थित असणाऱ्या एमसीएच्या पदाधिकाऱ्यांनी टाळ्या वाजवून दाद दिली.

पवारांच्या या गुगलीवर फडणवीस यांनी अगदी तशाच पद्धतीने शाब्दिक षटकार लगावताना सासरच्या माणसांना कोण टाळू शकतं? असा सवाल विचारताच सभागृहात पुन्हा हशा पिकला. “आताच पवारसाहेबांनी मुख्यमंत्र्यांवर जी काही जबाबदारी टाकली आहे. ती जबाबदारी टाकताना मुख्यमंत्र्यांना बांधून टाकलं आहे. सासरच्या माणसांना कोण टाळू शकतं?” असं फडणवीस यांनी हसतच विचारलं.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mca election sharad pawar says my father in law was shinde devendra fadnavis come out with epic reply scsg