मुंबई क्रिकेट संघटना म्हणजेच ‘एमसीए’ने मुंबई पोलिसांचे १३ कोटींहून अधिकचे बिल थकवले असल्याचे समोर आले आहे. विविध सामन्यांसाठी पोलिसांनी पुरवलेल्या सुरक्षेबद्दल हे बिल देण्यात आले असून यात आयपीएलच्या सामन्यांचाही समावेश आहे.

गिरगावमध्ये राहणारे जितेंद्र घाडगे यांना माहितीच्या अधिकाराअंतगर्त ही माहिती मिळाली. या माहितीनुसार, ‘एमसीए’ने थकवलेल्या बिलांमध्ये २०१३चा महिला क्रिकेट विश्वचषक, २०१६ चा टी २० विश्वचषक आणि भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यातील कसोटी याच्या सुरक्षेच्या रकमांचा समावेश आहे. २०१३ च्या महिला क्रिकेट विश्वचषकाचे ६ कोटी ६६ लाख, २०१६ च्या टी २० विश्वचषकाचे ३ कोटी ६० लाख आणि भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यातील कसोटीचे ५० लाखांचे बिल थकवले गेले आहे. तसेच प्रमोशनल सामन्यांचेही जवळपास ८३ लाखांचे बिल संघटनेने दिले नसल्याचे दिसत आहे.

‘एमसीए’ने मुंबई पोलिसांचे एवढे रुपये थकवले असूनही केवळ राजकीय दबावामुळे नव्या सामन्यांसाठी मुंबई पोलीस ‘एमसीए’ला सुरक्षा सेवा पुरवत आहे, असा आरोप घाडगे यांनी केला आहे. तसेच, ही थकवलेली बिले त्यांनी लवकरात लवकर भरावीत. कारण यातून मिळणारा पैसा हा पोलिसांसाठी होणाऱ्या कल्याणकारी कार्यक्रमांसाठी निधी म्हणून वापरला जातो, असेही घाडगे यांनी सांगितले आहे.

याबाबत बोलताना पोलीस उपायुक्त सचिन पाटील म्हणाले की थकबाकी मिळवण्यासाठी आमचे प्रयत्न सुरु आहेत. काही अडचणींमुळे ही थकबाकी आहे. मात्र आम्ही त्यावर तोडगा काढण्याचा प्रयत्न करू.

तर याबाबत बोलताना ‘एमसीए’चे एक अधिकारी म्हणाले की मुंबई पोलिसांनी प्रत्येक सामन्यासाठी समान सुरक्षा शुल्क लावले आहे. यात आयपीएलच्या सामान्यांपासून ते सराव सामन्यांपर्यंत सर्व सामन्यांचा समावेश आहे. या बाबत राज्य सरकारने लक्ष घालून काही सामन्यांचे शुल्क कमी करावे, अशी विनंती आम्ही राज्य सरकारला केली असल्याचे ते म्हणाले.

Story img Loader