मुंबई : वसई येथील सिमेंटचे ब्लॉक बनविण्याच्या कंपनीतून सुरू असलेला मेफेड्रॉन (एमडी) बनविण्याचा कारखाना साकीनाका पोलिसांनी उद्ध्वस्त केला. या कारवाईत चार किलो ५३ ग्रॅम एमडी हे अमली पदार्थ जप्त करण्यात आले. त्याची किंमत आठ कोटी चार लाख रुपये आहे. पोलिसांनी या कारवाईत सादिक सलीम शेख (२८) आणि सिराज सुलतान पंजवानी (५७) यांना अटक केली आहे.

साकीनाका पोलिसांचे अमली पदार्थविरोधी पथक २४ एप्रिल रोजी पोलीस ठाण्याच्या हद्दीत गस्त घालत असताना येथील काजुपाडा परिसरातील रेतीवाला कंपाऊंडमध्ये सार्वजनिक शौचालयाजवळ सादिक हा संशयास्पदरीत्या फिरताना सापडला. पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन झडती घेतली असता त्याच्याजवळ १० लाख सात हजार रुपये किमतीचे ५३ ग्रॅम एमडी सापडले.

पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल करून सादिकला अटक केली. त्याच्या चौकशीत त्याने एका व्यक्तीकडे एमडी विक्रीचे काम करत असल्याचे आणि त्याला मिरा रोडमधील रहिवासी सिराज पंजवानी हा अमली पदार्थ पुरवत असल्याची महत्त्वपूर्ण माहिती दिली. साकीनाका पोलिसांनी आरोपी पंजवानी याचा मिरा रोडमध्ये शोध घेऊन त्याला २६ एप्रिल रोजी अटक केली.

वसईतील कामण गावातील काळुराम चौधरी हा एमडी बनवून विकत असल्याचे त्याने सांगितले. त्यानुसार, साकीनाका पोलिसांनी चौधरी चालवत असलेल्या एम. के. ग्रीन एएसी ब्लॉक कंपनीवर छापा टाकला. सिमेंटचे ब्लॉक बनविणाऱ्या या कंपनीत चौधरी सापडला नाही. पण पोलिसांना येथील एका शेडमध्ये एमडी अमली पदार्थ बनवले जात असल्याचे दिसले. या शेडमधून चार किलो एमडी आणि एमडी बनवण्याचे साहित्य जप्त केले.