सुहास जोशी

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

शहर आणि महानगर परिसरांतून हजारो स्थलांतरित कामगारांना राज्याच्या सीमेपर्यंत सोडणाऱ्या एसटी चालकांना मात्र अनेक गैरसोयींना तोंड द्यावे लागत आहे. ठाण्यातील रात्रीच्या मुक्कामात अनेक एसटीचालक गाडीच्या टपावरच जेवण करीत असल्याची आणि झोपत असल्याची दृश्ये दृष्टीस पडत आहेत. शिवाय, या चालकांना तीन जिल्ह्य़ांतून स्थलांतरितांना नेताना करोना संसर्गाचा धोकाही आहे.

स्थलांतरितांना राज्याच्या सीमेपर्यंत जाण्यासाठी एसटीने १० मेपासून मोफत सेवा सुरू केली. मुंबई आणि महानगर परिसरांतून सध्या दिवसाला सुमारे ३०० बसगाडय़ा सुटतात. यासाठी नाशिक आणि अहमदनगर विभागांतून बसगाडय़ांसह चालकांची अतिरिक्त कुमक मागवली आहे.

ठाण्यात सुमारे दोनशे बसगाडय़ा रात्री मुक्कामाला असतात. कॅडबरी जंक्शन, खोपट मध्यवर्ती बस स्थानक, वंदना बस स्थानक या ठिकाणी बसगाडय़ा उभ्या करण्यात येतात. उन्हाळ्याचे दिवस, त्यातच शारीरिक अंतर पाळण्याचे बंधन यामुळे ठाण्यात मुक्कामाला असणारे अनेक चालक विश्रांती खोल्यांमध्ये न थांबता एसटीच्या टपालाच विश्रांतीस्थळ करतात. विश्रांती खोल्यांमध्ये आधीच गर्दी असल्याने संसर्गाचा धोका नको म्हणून टपावर झोपण्याचा पर्याय सुरक्षित आहे, असे काही चालकांनी सांगितले. त्यात नव्या गाडय़ांच्या टपावर सामान वाहून नेण्याची सुविधा नसल्याने अनेक चालकांना विश्रांतीस्थळात थांबून संसर्गाचा धोका पत्करावा लागतो.

या चालकांना आपल्या आगारातून सर्वप्रथम ठाणे येथे यावे लागते. त्यानंतर दुसऱ्या दिवशी स्थलांतरितांना घेऊन ते राज्याच्या सीमेपर्यंत जातात. तेथून पुन्हा मूळ आगारात जाऊन वाहन जमा करतात. त्यानंतर एक किंवा दोन दिवस विश्रांती घेऊन पुन्हा याच कर्तव्यावर रुजू व्हावे लागते. या प्रवासात त्यांना किमान तीन ते चार जिल्ह्य़ांची सीमा ओलांडावी लागते. अशा वेळी संसर्ग होण्याची भीती त्यांना सतावते. मात्र अत्यावश्यक सेवा असल्याने काम टाळता येत नसल्याची अगतिकता त्यांनी व्यक्त केली.

प्रवासात जेवणाचे हाल : सध्या सर्वच स्थलांतरित एसटीने जात असल्याने ठाणे ते राज्याच्या सीमेपर्यंतच्या टप्प्यातील अन्न, पाणी वगैरे सुविधादेखील मर्यादित असल्याचे या चालकांनी सांगितले. विशेषत: परतीच्या प्रवासात खिशात पैसे असूनही हॉटेल वगैरे सुरू नसल्याने जेवणाची गैरसोय होते, अशी व्यथा या चालकांनी मांडली. खोपट मध्यवर्ती बस स्थानकातील विश्रांती खोल्या, तसेच कामगारांच्या विश्रांती खोल्या आणि अन्य काही कार्यालयांची जागादेखील चालकांसाठी उपलब्ध केली असल्याचे एसटीच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. तसेच ठाणे येथील मुक्कामात महामंडळातर्फे जेवणाची सुविधा दिली जात असल्याचे त्यांनी सांगितले.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Meals and rest above the st abn