मुंबईतील गोवंडी भागात गोवरच्या आजाराचा उद्रेक झाला असून सर्वाधिक रुग्ण सापडत असलेल्या गोवंडी परिसरावर महानगरपालिकेने लक्ष केंद्रीत केले आहे. दरम्यान कचराभूमी आणि जैववैद्यकीय कचऱ्याची विल्हेवाट लावणाऱ्या प्रकल्पातून बाहेर पडणाऱ्या रासायनिक घटकांमुळे या भागात गोवरचा उद्रेक होत असल्याचा दावा करीत शिवाजी नगरमधील एका रहिवाशाने थेट केंद्रीय आरोग्य मंत्री भारती पवार यांना नोटीस पाठविली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा >>>मुंबई: मांडवा वॉटर टॅक्सीमधून दोन आठवड्यात २४०० प्रवाशांची सफर

गोवंडी परिसरात जैववैद्यकीय प्रकल्प असल्याने मागील दोन वर्षांपासून गोवंडीच्या झोपडपट्टीतील नागरिकांना विविध आजारांचा सामना करावा लागत आहे. यामुळे येथे राहणारे नागरिक क्षय, दमा यांसारख्या आजाराने ग्रस्त आहेत. त्यातच आता गोवर या आजाराचा गोवंडीमध्ये उद्रेक झाला आहे. गोवंडीमधील कचराभूमीवर संपूर्ण शहरातील कचऱ्याची विल्हेवाट लावली जाते. त्यामुळे येथील वातावरण प्रदुषित झाले आहे. त्यातच कचराभूमीपासून १५० मीटर अंतरावर आणखी एक जैववैद्यकीय प्रकल्प आहे. यातून बाहेर पडणारा धूर प्रचंड घातक आहे. यामध्ये हायड्रोक्लोरिक ॲसिड, सल्फर डायऑक्साईड आणि सल्फर ट्रायऑक्साईडसारख्या घातक रसायनांचा समावेश आहे. गेल्या १३ वर्षांपासून हा प्रकार सुरू असल्याने येथील नागरिकांना आरोग्याच्या अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. यासंदर्भात ‘न्यू संगम वेल्फेअर सोसायटी’चे संस्थापक अध्यक्ष फैयाज आलम शेख यांनी मुंबई उच्च न्यायालय आणि राष्ट्रीय हरित लवादामध्ये प्रकरण दाखल केले आहे.

हेही वाचा >>>मुंबईः संचित रजा संपल्यानंतर कारागृहात परतण्याऐवजी पळालेल्या दोन आरोपींना अटक

गोवंडीतील प्रदुषणामुळे येथील मृत्यूदर ९.८ टक्के इतका असल्याचे टाटा समाज विज्ञान संस्थेच्या संशोधनातून स्पष्ट झाले आहे. त्यामुळे फैयाज आलम शेख यांनी केंद्रीय आरोग्य मंत्री भारती पवार यांना नोटीस पाठवली आहे. यासंदर्भात लक्ष घालून आणि तपासणी करून त्याचा अहवाल पर्यावरण मंत्रालय पर्यावरण नियंत्रण महामंडळ आणि आम्हाला सादर करावा. तसेच वातावरणात घातक रसायन सोडणाऱ्या प्रकल्पावर तातडीने कारवाई करून ते बंद करण्याचे आदेश द्यावेत, याप्रकरणी विलंब झाला किंवा दुर्लक्ष करण्यात आल्यास न्यायालयात दाद मागण्यात येईल, असा इशारा फैयाज आलम शेख यांनी नोटीसमध्ये दिला आहे.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Measles outbreak in govandi due to waste land and biomedical project mumbai print news amy