महाराष्ट्रातील गोवर उद्रेकाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने स्थापन केलेल्या कृती दलाने एकही बाळ लसीपासून वंचित राहू नये यासाठी विशेष गोवर रुबेला लसीकरण मोहीम हाती घेतली आहे. याअंतर्गत १५ डिसेंबरपासून दोन टप्प्यांमध्ये लसीकरण मोहीम राबविण्यात येत आहे. पहिल्या टप्प्यात एक लाख २४ हजार ४६७, तर मुंबईत सहा हजार २५७ बालकांचे लसीकरण करण्यात आले आहे. मात्र हे प्रमाण फारच कमी असून विशेष लसीकरण मोहिमेला पालकांकडून अल्प प्रतिसाद मिळत असल्याचे निदर्शनास येत आहे.
हेही वाचा >>>मुंबई: समृद्धी महामार्गावरील सुविधांना विलंब होण्याची चिन्हे; फूड प्लाझा, अन्य सुविधांच्या निविदा प्रक्रियेला मुदतवाढ
राज्यातील ९ महिने ते ५ वर्षे या वयोगटातील प्रत्येक बालकाला गोवर रुबेला लसीच्या दोन मात्र २८ दिवसांच्या अंतराने देण्याचा निर्णय राज्य कृती दलाने घेतला आहे. त्यानुसार राज्यातील गोवर रुबेला लसीपासून वंचित राहिलेल्या प्रत्येक बालकाला लस देण्यासाठी राज्य कृती दलाने विशेष लसीकरण मोहीम राबविण्याची सूचना केली आहे. ही मोहीम १५ डिसेंबरपासून सुरू होऊन प्रजासत्ताक दिनापर्यंत सर्व बालकांचे लसीकरण करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. ही मोहीम दोन टप्प्यात राबविण्यात येणार असून, पहिला टप्पा १५ ते २५ डिसेंबर आणि दुसरा टप्पा १५ ते २५ जानेवारीदरम्यान राबविण्यात येणार आहे. त्यानुसार पहिला टप्पा २५ डिसेंबर रोजी पूर्ण झाला असून, पहिल्या टप्प्यात राज्यात एक लाख २४ हजार ४६७ बालकांचे लसीकरण करण्यात आले आहे. यामध्ये गोवर रुबेला लसीची पहिली मात्रा देण्यात आलेल्या बालकांची संख्या ६२ हजार ९४०, तर लसीची दुसरी मात्रा देण्यात आलेल्या बालकांची संख्या ६१ हजार ५२७ इतकी आहे. तसेच मुंबईमध्ये विशेष लसीकरण मोहिमेंतर्गत पहिल्या फेरीत ४९४ लसीकरण सत्रामध्ये ९ महिने ते ५ वर्ष वयोगटातील ३,११८ (९५.१८ टक्के) मुलांना एमआरसीव्ही १ या लसीची मात्रा तर १६ महिने ते ५ वर्षांच्या ३,१३९ (९०.४० टक्के) मुलांना एमआरसीव्ही २ लसीची मात्रा देण्यात आली.
हेही वाचा >>>विश्लेषण: उपकर प्राप्त इमारतींच्या पुनर्विकासाचा मार्ग मोकळा कसा? यातून कोणाला फायदा होणार?
राज्यात २५ डिसेंबरपर्यंत १४ हजार ९२० अतिरिक्त लसीकरण सत्रांचे आयोजन करण्यात आले आहे. तसेच जीवनसत्त्व ‘अ’ची मात्रा देण्यात आलेल्या बालकांची संख्या एक लाख ६२ हजार २५३ इतकी आहे. गोवर प्रभावीत १,३७० सर्वेक्षण पथके कार्यरत असून, त्यांनी आतापर्यंत २७ लाख ८८ हजार ४४७ घरांचे सर्वेक्षण केले आहे.
बांधकाम स्थळ, पुलाखालील बालकांसाठी मोबाइल लसीकरण सत्र
बांधकाम स्थळ व पुलाखाली राहणाऱ्या मुलांसाठी २४ डिसेंबरपासून मोबाइल लसीकरण सत्र आयोजित करण्यात येत आहेत. बांधकामाच्या ठिकाणी ९३ पैकी ४४ (४७.३ टक्के) मुलांना एमआरसीव्ही १ लसीची मात्रा, तर ९१ पैकी २७ (२९.७ टक्के) मुलांना एमआरसीव्ही २ लसीची दुसरी मात्रा देण्यात आली आहे. पुलाखाली राहणाऱ्या ठिकाणी ११५ पैकी ७३ (६३.५ टक्के) मुलांना एमआरसीव्ही १ लसीची मात्रा, तर ५६ पैकी २१ (३७.५ टक्के) मुलांना एमआरसीव्ही २ लसीची मात्रा देण्यात आली.