मुंबई : मुंबईत गोवरच्या साथीचा धोका वाढला असून, गेल्या २० दिवसांत सात संशयित गोवरग्रस्त बालकांचा मृत्यू झाला. दुसरीकडे, शहरातील तब्बल २० हजार बालकांनी गोवर प्रतिबंधक लस घेतलीच नसल्याचे उघडकीस आल्यामुळे चिंतेत भर पडली आहे. गेल्या काही दिवसांपासून मुंबईत गोवरच्या रुग्णांच्या संख्येत सातत्याने वाढ होत आहे. आतापर्यंत १४२ रुग्ण आढळून आले असून २६ ऑक्टोबरपासून सात बालकांचा मृत्यू गोवरमुळे झाल्याचा संशय आहे. त्यातील चार मृत्यू कस्तुरबा रुग्णालयात, दोन राजावाडी रुग्णालयात झाले, तर एका बालकाचा घरी मृत्यू झाला. बहुतांश रुग्णांवर कस्तुरबा रुग्णालयात उपचार सुरू असून, पाच रुग्ण अतिदक्षता विभागात, तर एक रुग्ण कृत्रिम श्वसन यंत्रणेवर आहे. शहरातील आठ विभागांमधील झोपडपट्टय़ांमध्ये रुग्णांची संख्या सर्वाधिक आहे. यातील सर्वाधिक म्हणजे ५० रुग्ण गोवंडीत आहेत. त्याखालोखाल कुर्ला येथे ३१ रुग्ण आढळले आहेत. बालकांच्या मृत्यूसंदर्भात नेमलेल्या समितीचा अहवाल येत्या दोन ते तीन दिवसांत येण्याची शक्यता असल्याचे महापालिकेच्या मुख्य आरोग्य अधिकारी डॉ. मंगला गोमारे यांनी सांगितले.

गोवरच्या रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता कस्तुरबा रुग्णालयात तीन कक्ष सुरू करण्यात आले आहेत. यामध्ये ८३ खाटा, १० अतिदक्षता विभागातील खाटा आणि ५ कृत्रिम प्राणवायूची व्यवस्था असलेल्या खाटा आहेत. गोवंडी, मानखुर्द, कुर्ला भागातील रुग्णसंख्या लक्षात घेता गोवंडी शताब्दी रुग्णालयात १० खाटा वाढवण्यात आल्या आहेत. गोवंडीतील प्रसुतीगृहातही रुग्णांना दाखल करण्याची व्यवस्था करण्यात आली असून, विलगीकरण कक्षही सुरू करण्यात आला आहे. लक्षणे आढळणाऱ्या मुलांना तातडीने ‘अ’ जीवनसत्वाच्या दोन मात्रा देण्यात येत आहेत. परिस्थिती गंभीर असल्यास रुग्णालयात दाखल करण्यात येत आहे.

newborn babies killed jhansi marathi news
अन्वयार्थ : ‘उत्तम प्रदेशा’तल्या बाळांची होरपळ
Eknath Shinde on Ladki Bahin Yojana Sixth installment
महायुतीला सत्ता मिळाली, लाडक्या बहिणींना २१०० रुपये कधीपासून…
violence erupts in manipur after recovery of bodies
मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; तीन मृतदेह सापडल्यानंतर नागरिक संतप्त; राजकीय नेत्यांच्या घरांवर हल्ले
pets cats
पाळीव प्राण्यांच्या विरहाच्या भीतीने नैराश्य, तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या
nagpur,tiger,railway,
VIDEO : हे काय ! रेल्वेच्या धडकेत १३ वाघ मृत्युमुखी
pune accidents latest marathi news
पुणे : शहरात वेगवेगळ्या अपघातात तिघांचा मृत्यू
stomach cancer marathi news
पोटदुखीकडे करू नका दुर्लक्ष!

एकीकडे रुग्णसंख्या आणि संशयित मृत्यूंचा आकडा वाढत असताना शहरातील २० हजार बालके अद्याप लसीकरणापासून वंचित असल्याची बाब समोर आली आहे. गोवंडी परिसरात सप्टेंबरमध्ये गोवरचे रुग्ण आढळण्यास सुरूवात झाली. त्यानंतर महापालिकेच्या आरोग्य विभागाने ० ते २ या वयोगटातील बालकांची तपासणी सुरू केली. या तपासणीमध्ये तब्बल २० हजार बालकांनी गोवरला प्रतिबंध करणारी एमआर १ आणि एमएमआर २ ही लसच घेतली नसल्याचे उघडकीस आले आहे. यामध्ये काही बालकांनी एक मात्रा घेतली आहे, तर काही बालकांनी एकही मात्रा घेतलेली नाही. विशेषत: गोवरचे रुग्ण आढळून आलेल्या भागांमध्ये लसीकरणाबाबत जागरुकता नसल्याचे दिसते.

 (वाढाव्यासोबत घ्या) लस कधी घ्यावी?

मात्रा १ – नऊ ते १२ महिने

मात्रा २ – १६ ते २४ महिने

 (वाढाव्यासोबत घ्या) खबरदारीचे उपाय

गोवरचा विषाणू हवेतून पसरतो व संपर्कात आलेल्या व्यक्तीच्या श्वसन संस्थेतून शरीरात प्रवेश करतो. या रोगाची लक्षणे आढळल्यास घाबरून न जाता जवळच्या आरोग्य केंद्राशी संपर्क साधावा व काळजी घ्यावी, असे आवाहन राज्याच्या आरोग्य विभागाने केले आहे.

धोकादायक विभाग

भाग  –     रुग्ण     भाग –    रुग्ण

गोवंडी – ५०

कुर्ला –  ३१

मालाड – १५

माटुंगा – १३

सांताक्रुझ –  १२

चेंबूर –  ७

दादर –  ७

भायखळा –  ६

पालिका प्रयत्नशील

गोवरचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी महापालिकेने सर्व मुलांचे लसीकरण करण्यावर भर दिला आहे. त्यासाठी विविध विभागांमध्ये विशेष शिबिरे घेण्यास सुरूवात केली आहे. या शिबिरांसाठी महापालिकेच्या आरोग्य विभागातील १५० पेक्षा अधिकारी, कर्मचारी आणि आशा सेविका नेमण्यात आल्या आहेत.

तात्काळ उपाययोजना करा : मुख्यमंत्री

गोवर संसर्गाची तीव्रता लक्षात घेऊन महानगरपालिकेने आवश्यक सर्व उपाययोजना तात्काळ करण्याचे आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंगळवारी दिले. त्यांनी महापालिका प्रशासक इक्बालसिंह चहल यांच्याशी दूरध्वनीवरून चर्चा केली आणि आवश्यक सूचना दिल्या. संसर्ग फैलावणार नाही, याची काळजी घ्यावी असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले. मुंबईचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांनी महापालिका मुख्यालयात बैठक घेतली. बालकांसाठी तातडीने लसीकरण मोहीम राबविण्याचे आदेश त्यांनी दिले.