मुंबई : मुंबईत गोवरच्या साथीचा धोका वाढला असून, गेल्या २० दिवसांत सात संशयित गोवरग्रस्त बालकांचा मृत्यू झाला. दुसरीकडे, शहरातील तब्बल २० हजार बालकांनी गोवर प्रतिबंधक लस घेतलीच नसल्याचे उघडकीस आल्यामुळे चिंतेत भर पडली आहे. गेल्या काही दिवसांपासून मुंबईत गोवरच्या रुग्णांच्या संख्येत सातत्याने वाढ होत आहे. आतापर्यंत १४२ रुग्ण आढळून आले असून २६ ऑक्टोबरपासून सात बालकांचा मृत्यू गोवरमुळे झाल्याचा संशय आहे. त्यातील चार मृत्यू कस्तुरबा रुग्णालयात, दोन राजावाडी रुग्णालयात झाले, तर एका बालकाचा घरी मृत्यू झाला. बहुतांश रुग्णांवर कस्तुरबा रुग्णालयात उपचार सुरू असून, पाच रुग्ण अतिदक्षता विभागात, तर एक रुग्ण कृत्रिम श्वसन यंत्रणेवर आहे. शहरातील आठ विभागांमधील झोपडपट्टय़ांमध्ये रुग्णांची संख्या सर्वाधिक आहे. यातील सर्वाधिक म्हणजे ५० रुग्ण गोवंडीत आहेत. त्याखालोखाल कुर्ला येथे ३१ रुग्ण आढळले आहेत. बालकांच्या मृत्यूसंदर्भात नेमलेल्या समितीचा अहवाल येत्या दोन ते तीन दिवसांत येण्याची शक्यता असल्याचे महापालिकेच्या मुख्य आरोग्य अधिकारी डॉ. मंगला गोमारे यांनी सांगितले.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा