दिवसाला २.५ कोटी रुपयांचा तोटा होण्याची शक्यता
बेभरोशाच्या पावसामुळे शेती धोक्यात आल्याने महाराष्ट्रातील अनेक शेतकऱ्यांनी कुक्कुटपालन व्यवसायाकडे आपला मोर्चा वळविला. मात्र गेल्या काही वर्षांत कोंबडय़ांचे उत्पादन प्रचंड वाढले असून मागणी रोडावल्याने हा कुक्कुटपालन व्यवसाय मंदीच्या दुष्टचक्रात अडकला आहे. मुंबईमध्ये दररोज सुमारे पाच लाख कोंबडय़ा फस्त केल्या जात असून कोंबडय़ांच्या विक्रीवर एक दिवस बंदी घातल्यास मंदीच्या गर्तेत अडकलेल्या व्यावसायिकांना दिवसाला २.५ कोटी रुपये तोटा सहन करावा लागेल आणि त्याचे परिणाम ग्रामीण भागातील अर्थव्यवस्थेवरही होतील, अशी भीती व्यक्त होत आहे.
महाराष्ट्रामध्ये आजघडीला सुमारे १.५ लाख कुक्कुटपालन उद्योग असून सुमारे १५ लाख कुटुंबांचा उदरनिर्वाह या उद्योगावर अवलंबून आहे. कोंबडी उत्पादनात देशात महाराष्ट्र आघाडीवर असून दर महिन्याला महाराष्ट्रामध्ये सुमारे ३.५ कोटी कोंबडय़ांचे उत्पादन होते. त्यामुळे इतर राज्यांमध्येही या कोंबडय़ा विक्रीसाठी पाठविल्या जातात. कोंबडय़ांच्या उत्पादनात प्रचंड वाढ झाली असली तरी मागणीत मात्र सातत्याने घसरण होत असून गेल्या दोन वर्षांपासून हा व्यवसायाला मंदीचे ग्रहण लागले आहे. यंदा श्रावण महिना सुरू झाल्यानंतर कोंबडय़ांच्या घाऊक दरात प्रचंड घसरण झाली. कोंबडी उत्पादनाचा सरासरी दर ६५ रुपये असून ती कोंबडी सध्या ३७ रुपये घाऊक दरात विकली जात आहे. हीच कोंबडी पुढे मुंबईत १०० ते १२५ रुपयांना विकली जाते.
मुंबईत बंदी असल्यामुळे दररोज पाच लाख कोंबडय़ा इतर शहरांतील बाजारपेठांमध्ये पाठवाव्या लागणार आहेत. अतिरिक्त पुरवठा झाल्यामुळे त्या बाजारपेठांमध्ये कोंबडय़ांच्या किमती घसरण्याची भीती या व्यवसायातील तज्ज्ञ राघवेंद्र जोशी यांनी व्यक्त केली आहे. पुरवठा वाढल्याने पुढील १५ दिवस त्याचा विपरीत परिणाम बाजारामध्ये जाणवतो, असेही ते म्हणाले. सध्या ९० टक्के कुक्कुटपालन व्यावसायिकांची आर्थिक स्थिती डळमळीत झाली आहे. बँकांचे हप्तेही वेळेवर फेडण्याच्या स्थितीत नाहीत. त्यामुळे व्यवसायासाठी कर्ज मिळणे बंद होत चालले आहेत. सरकारने मदत करण्याऐवजी मांस विक्री बंदीसारखे निर्णय घेऊन हा व्यवसाय आणखी धोक्यात आणला आहे, अशी खंत जोशी यांनी व्यक्त केली.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा