जमिनीवरून वाहणारे माशांचे पाणी, कुजलेल्या माशांचा वास, उडय़ा मारत फिरणारे बोके आणि मासे ताजे की शिळे यावरून रंगणारा वाद.. अस्सल मत्स्यप्रेमींना रोजच्या मासेबाजारातील या गोंधळाला सामोरे जावे लागते. या सगळ्यापासून सुटका करत ग्राहकापर्यंत ताजे व स्वच्छ मासे पोहोचवण्यासाठी आता अन्न व औषध प्रशासन (एफडीए) सरसावले आहे. दुधापासून किराणा सामानापर्यंत आणि किरकोळ विक्रेत्यांपासून मॉलपर्यंत सर्वत्र असलेल्या एफडीएच्या अमलाखाली आता मांस आणि मासेविक्रेतेही येणार आहेत.
एकीकडे दुधापासून भाज्यांपर्यंत आणि कांदे-बटाटय़ांपासून तयार अन्नपदार्थापर्यंत सर्वाच्या पॅकिंग आणि दुकानातील मांडणीमध्ये आमूलाग्र बदल झाले असताना मांस आणि मासळी बाजारातील अनुभव पूर्वीसारखाच आहे. या बाजारांत आजही दरुगधी, माश्यांचे थवे, रस्त्यावरूनच जाणारे सांडपाणी, किडे, कुत्र्यामांजरांची लुडबुड, असे चित्र पाहायला मिळते. हेच दृश्य बदलण्यासाठी अन्न व औषध प्रशासनाने पावले उचलली आहेत. राज्यातील पन्नास टक्क्य़ांहून अधिक रहिवाशांच्या जेवणात मांसाहार असतो, मात्र शाकाहाराच्या दर्जाबाबत आग्रही असलेल्या अन्न व औषध प्रशासनाकडून आतापर्यंत मांसाहाराची फारशी दखल घेण्यात आली नव्हती. एफडीएचे नवीन आयुक्त डॉ. पुरुषोत्तम भापकर यांनी मात्र सर्वच अन्नपदार्थ विक्रेत्यांबाबत प्रशिक्षण व कारवाई असे धोरण अवलंबले आहे.
‘सुरक्षित अन्न हा सर्वाचा अधिकार आहे. राज्यातील गृहिणी, विद्यार्थ्यांना अन्नसाक्षर करण्यासाठी कार्यशाळा सुरू झालेल्या असतानाच सुरक्षित अन्न ग्राहकांपर्यंत नेणेही आवश्यक आहे. रस्त्यावरच्या खाद्यपदार्थाच्या गाडय़ांपासून पंचतारांकित हॉटेलपर्यंत आणि किराणा दुकानांपासून मॉलपर्यंत सर्वच ठिकाणांहून शुद्ध व निर्भेळ अन्न पुरवण्याच्या दृष्टीने पावले उचलली आहेत. मांस व मासे विक्रेत्यांनीही ग्राहकांना स्वच्छ व ताजे अन्न पुरवावे, अशी अपेक्षा आहे. त्यामुळे अन्न व औषध प्रशासनाकडून याबाबत पावले उचलली जात आहेत,’ असे डॉ. भापकर यांनी सांगितले.
‘आमचीही तयारी आहे’
अनेक मासेबाजारांसमोरच मांडलेल्या कचराकुंडय़ा व माशांचा कचरा उचलला न गेल्याने सुटणारा वास यामुळे कोळी भगिनीही त्रासल्या आहेत. आम्हीही आधुनिक पद्धतीने मासेविक्री करण्यास तयार आहोत. त्यासाठी मासे ठेवण्यासाठी कोल्ड स्टोरेज आणि माशांचा उर्वरित कचरा तत्परतेने उचलण्यासाठी पालिकेकडून अधिक चांगली व्यवस्था होणे गरजेचे आहे. मात्र कोणतीही मदत न करता कारवाई होणार असेल तर त्याला आम्ही कडाडून विरोध करू, असे अखिल महाराष्ट्र मच्छीमार कृती समितीचे अध्यक्ष दामोदर तांडेल यांनी सांगितले.

*दूध, किराणा सामान, रस्त्यावरील विक्रेते, किरकोळ विक्रेते, मांस-मासे विक्रेते अशा अन्नाशी संबंधित क्षेत्रांसाठी अन्न व औषध प्रशासन मार्गदर्शक तत्त्वे लागू करणार.

*स्वच्छ वातावरणात ताजे व आरोग्यदायी अन्न ग्राहकांपर्यंत पोहोचवण्यासाठी घ्यावयाच्या काळजीचा त्यात समावेश. अन्न सुरक्षा अभियानांतर्गत जागृती करणार.

Story img Loader