ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर यांनी सोमवारी आम आदमी पक्षाला आपला पूर्ण पाठिंबा असल्याचे जाहीर केले. मेधा पाटकर आम आदमी पक्षामध्ये सहभागी होण्याची शक्यता राजकीय वर्तुळात व्यक्त करण्यात येत होती. मात्र, त्यांनी पक्षामध्ये थेट प्रवेश करण्याऐवजी पक्षाला पाठिंबा देण्याचा मार्ग स्वीकारला.
मुंबईमध्ये पत्रकार परिषदेमध्ये मेधा पाटकर यांनी सर्व जनआंदोलन चळवळीतील कार्यकर्त्यांच्या बैठकीनंतर आम आदमी पक्षाला पाठिंबा देण्याची घोषणा केली. त्या म्हणाल्या, आम आदमी पक्षाची ध्येय, धोरणे आम्हाला मान्य आहेत. पक्षाचे नेते अरविंद केजरीवाल आणि योगेंद्र यादव यांच्याशी झालेल्या चर्चेनंतर आम्ही पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला. आजपासून आम्ही आम आदमी पक्षाला संपूर्ण पाठिंबा देत आहोत.
दिल्लीमध्ये नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत आम आदमी पक्ष दुसऱया क्रमांकावरील सर्वांत मोठा पक्ष म्हणून निवडून आला. कॉंग्रेसने दिलेल्या पाठिंब्यामुळे आम आदमी पक्षाने दिल्लीमध्ये सत्ताही मिळवली. या पार्श्वभूमीवर अनेक लोकं आम आदमी पक्षामध्ये सहभागी होत आहेत. पक्षाने सुरू केलेल्या सदस्य नोंदणी अभियानालाही मोठा प्रतिसाद मिळतो आहे.