मुंबई : भाजप नेते किरीट सोमय्या यांच्या पत्नी मेधा यांनी केलेला मानहानीचा आरोप आपल्याला मान्य नाही, असे शिवसेना खासदार संजय राऊत यांनी गुरुवारी शिवडी न्यायालयाला सांगितले. त्यामुळे राऊत यांच्यावर याप्रकरणी आता खटला चालवला जाईल.

अटकेत असल्याने राऊत यांना दुपारी १२ वाजता दूरचित्रसंवादाच्या माध्यमातून हजर करण्याचे आदेश महानगरदंडाधिकारी पी. आय. मोकाशी यांनी आर्थर रॉड कारागृहाला दिले. त्यानंतर राऊत यांना दूरचित्रसंवादाच्या माध्यमातून हजर न्यायालयासमोर हजर करण्यात आले. त्यावेळी न्यायालयाने त्यांना त्यांच्याविरोधातील गुन्हा मान्य आहे का ? अशी विचारणा केली. त्यावर राऊत यांनी आपल्याला गुन्हा मान्य नसल्याचे सांगितले. न्यायालयाने आता प्रकरणाची सुनावणी १९ सप्टेंबर रोजी ठेवली आहे.

अटकेत असल्याने राऊत हे मेधा सोमय्या यांनी दाखल केलेल्या मानहानीच्या तक्रारीप्रकरणी जबाब नोंदवण्यासाठी मागील सुनावणीच्या वेळी न्यायालयत हजर होऊ शकले नाहीत. त्यामुळे त्यांना जबाब नोंदवण्यासाठी हजर करण्याचे आदेश अंमलबजावणी संचालनालयाला (ईडी) द्यावेत, अशी मागणी मेधा सोमय्या यांनी न्यायालयाकडे केली होती.

याप्रकरणी गुरुवारी सुनावणी झाली. तेव्हा न्यायालयाने राऊत यांना दूरचित्रसंवादाच्या माध्यमातून दुपारी १२ वाजता न्यायालयात हजर करण्याचे आदेश आर्थर रोड कारागृह प्रशासनाला दिले.

शंभर कोटी रुपयांच्या शौचालय घोटाळ्याचा आरोप राऊत यांनी सोमय्या यांच्यावर केला होता. त्यावरून मेधा यांनी राऊत यांच्याविरोधात मानहानीचा दावा केला आहे.

Story img Loader