एखाद्या व्यक्तीला दहशतवादाचा समर्थक संबोधण्याचा अधिकार माध्यमांना नाही. त्यामुळे भारतीय धर्मोपदेशक झाकीर नाईक यांच्याविरोधातील मीडिया ट्रायल बंद व्हायला हवे, अशी भूमिका ओवेसी यांच्या एमआयएम पक्षाने घेतली आहे. दहशतवादाला चिथावणी दिल्याचा आरोप असणाऱया झाकीर नाईक यांच्यावर बंदी घालण्याची मागणी देशातील मुस्लिम संघटना करत असताना ‘एमआयएम’ पक्ष मात्र नाईक यांच्या बचावासाठी पुढे सरसावला.

वाचा: झाकीर नाईकच्या उपदेशांच्या तपासासाठी नऊ पथके

झाकीर नाईक यांच्याविरोधात ‘मीडिया ट्रायल’चा एमआयएम पक्षाचे नेते आणि औरंगाबादचे आमदार इम्तियाज जलील यांनी निषेध व्यक्त केला असून, नाईक यांच्या समर्थनार्थ एक पत्रक जारी केले आहे. झाकीर नाईक यांच्याविरोधात अद्याप कुठलीही तक्रार किंवा गुन्हा नोंदवला गेलेला नसताना देशातील काही प्रमुख वाहिन्यांनी त्यांना दोषी ठरवून टाकले आहे. तसेच नाईक यांना दहशवाद्यांचे समर्थक संबोधले जात आहे. माध्यमांना एखाद्या व्यक्तीला दहशतवादाचा समर्थक ठरविण्याचा अधिकार नाही. यामुळे माध्यमांनी नाईक यांच्याविरोधातील मीडिया ट्रायल बंद करायला हवा, अशी मागणी ‘एमआयएम’ने जारी केलेल्या पत्रकातून करण्यात आली आहे. नाईक दोषी असतील तर त्यांच्यावर नक्कीच कारवाई होईल, पण त्यांना आधीच दोषी ठरवू नका असेही ‘एमआयएम’च्या पत्रकात नमूद करण्यात आले आहे