लोकसत्ता प्रतिनिधी

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मुंबई : वैद्यकीय महाविद्यालयांनी २०२५-२६ या शैक्षणिक वर्षात पदवी व पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रम व नवीन वैद्यकीय महाविद्यालय सुरू करण्यासाठी राष्ट्रीय आयुर्विज्ञान आयोगाकड मोठ्या प्रमाणात अर्ज केले आहेत. त्यामुळे या वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये विद्यार्थ्यांना पुरविण्यात येणाऱ्या सोयी-सुविधा, उपलब्ध प्राध्यापक संख्या, उपकरणे व साहित्य यांची तपासणी करण्याचा निर्णय राष्ट्रीय आयुर्विज्ञान आयोगाने घेतला असून, वैद्यकीय मूल्यांकन आणि क्रमवारी मंडळाने ही तपासणी प्रक्रिया लवकरच सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. ही प्रक्रिया योग्य वेळेत सुरू करण्यासाठी मूल्यांकन करण्याकरीता सरकारी वैद्यकीय महाविद्यालयातील प्राध्यापकांना नोंदणी करण्याचे आवाहन राष्ट्रीय आयुर्विज्ञान आयोगाकडून करण्यात आले आहे.

भारतातील वैद्यकीय शिक्षणाची गुणवत्ता सुनिश्चित करण्यासाठी आणि वाढविण्यासाठी वैद्यकीय महाविद्यालयांची तपासणी ही एक महत्त्वाची प्रक्रिया आहे. राष्ट्रीय आयुर्विज्ञान आयोगामार्फत ही प्रक्रिया राबविण्यात येते. त्यानुसार २०२५-२६ या शैक्षणिक वर्षामध्ये नवीन वैद्यकीय महाविद्यालय आणि पदवी व पदव्युत्तर पदवी वैद्यकीय अभ्यासक्रमांच्या जागा वाढविण्याबाबत अर्ज केलेल्या विविध वैद्यकीय महाविद्यालयांची राष्ट्रीय आयुर्विज्ञान आयोगाच्या वैद्यकीय मूल्यांकन आणि क्रमवारी मंडळाकडून अचानक तपासणी करण्यात येणार आहे. यामध्ये वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये विद्यार्थ्यांना पुरविण्यात येणाऱ्या सोयी-सुविधा, विद्यावेतन, उपलब्ध प्राध्यापक संख्या, उपलब्ध उपकरणे व साहित्य, रुग्णालयातील खाटा, प्रयोगशाळा, ग्रंथालय, वसतिगृह, उपहारगृह यासह विविध सुविधांची तपासणी करण्यात येणार आहे. ही तपासणी प्रक्रिया लवकरच सुरू करण्याचा निर्णय वैद्यकीय मूल्यांकन आणि क्रमवारी मंडळाने घेतला आहे.

आणखी वाचा-अनुयायांच्या विश्रांतीसाठी रेल्वे स्थानकात सुविधा, एकाचवेळी १० हजार अनुयायी थांबण्याची व्यवस्था

तपासणी प्रक्रिया योग्य वेळेत व्हावी यासाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील प्राध्यापकांची नियुक्ती करण्याचा निर्णय आयोगाने घेतला आहे. वैद्यकीय महाविद्यालयांचे मूल्यमापन करण्यासाठी वैद्यकीय महाविद्यालयातील प्राध्यापकांनी १५ दिवसांत अर्ज करावे, अशी सूचना आयोगाने वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठात्यांना केली आहे. त्यानुसार वैद्यकीय मूल्यांकन आणि क्रमवारी मंडळाच्या संकेतस्थळावर गुगल अर्जाची लिंक प्राध्यापकांसाठी उपलब्ध करण्यात आली आहे. ही लिंक भरून प्राध्यापकांना अर्ज करण्याचे आवाहन राष्ट्रीय आयुर्विज्ञान आयोगाने केले आहे.

राष्ट्रीय आयुर्विज्ञान आयोगाकडून करण्यात आलेल्या तपासणीमध्ये नियमानुसार सोयी-सुविधा व पायाभूत सुविधा उपलब्ध नसल्यास संबंधित वैद्यकीय महाविद्यालयाला मान्यता नाकारली जाऊ शकते किंवा जागा वाढीसंदर्भातील त्या वैद्यकीय महाविद्यालयाचा अर्ज फेटाळाला जाऊ शकतो. त्यामुळे मान्यता मिळविण्यासाठी वैद्यकीय महाविद्यालयांना सज्ज राहावे लागणार आहे.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Medical colleges in state will be inspected soon mumbai print news mrj