पालिका रुग्णालयात उपचारासाठी येणारे मध्यमवर्गीय आणि उच्च उत्पन्न गटातील रुग्णांकडून शुल्क घेण्यात यावे, असे दस्तूरखुद्द स्थायी समिती अध्यक्ष राहुल शेवाळे यांनी सूचित केले आहे. त्यामुळे मुंबईकरांना मोफत आरोग्य सेवा उपलब्ध करुन देण्याच्या शिवसेनेच्या निवडणुकीतील वचनाला तडा गेला आहे. याचा फटका विधानसभेच्या आगामी निवडणुकीत शिवसेनेला बसण्याची शक्यता नाकारता येत नाही.
महापालिकेच्या रुग्णालयात अत्याधुनिक उपकरणे असून रुग्णांवरील उपचारासाठी उत्तमोत्तम डॉक्टर उपलब्ध आहेत. त्यामुळे महापालिका रुग्णालयांमध्ये सर्वच स्तरातील रुग्णांचा ओघ असतो. मध्यमवर्गीय आणि उच्च उत्पन्न गटातील रुग्णांनी महापालिकेच्या कूपर, कांदिवली शताब्दी, जोगेश्वरी ट्रॉमा रुग्णालयात उपचारासाठी यावे यासाठी तेथे नीटनेटके स्वतंत्र रुग्णकक्ष तयार करण्यात आले आहेत. या रुग्णालयांतील सेवेचा लाभ घेणाऱ्या मध्यमवर्गीय आणि उच्च उत्पन्न गटातील रुग्णांकडून आवश्यक ते शुल्क घ्यावे, असे राहुल शेवाळे यांनी आपल्या अर्थसंकल्पीय भाषणात सूचित केले आहे. त्यामुळे पालिका वर्तुळात तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.
महापालिका निवडणुकीच्या वेळी मुंबईकरांना चांगली आणि निशुल्क आरोग्य सेवा देण्याचे वचन शिवसेनेकडून देण्यात आले होते. असे असतानाही मध्यमवर्गीय आणि उच्च उत्पन्न गटातील रुग्णांकडून शुक्ल घेण्याचा सल्ला राहुल शेवाळे यांनी प्रशासनाला दिला आहे. परिणामी मध्यमवर्गीय आणि उच्च उत्पन्न गटाच्या नाराजीचे ते धनी बनण्याची शक्यता आहे. त्याचा फटका भविष्यात होणाऱ्या निवडणुकांमध्ये शिवसेनेला भोगावा लागणार आहे.

Story img Loader