मुंबई : एखादे चांगले महाविद्यालय मिळावे, वैद्यकीय कारण, एकल पालक किंवा काही ठराविक कारणासाठी वैद्यकीय विद्यार्थ्यांना एमबीबीएसच्या प्रथम वर्षानंतर महाविद्यालय बदलण्याची संधी देणारा नियम राष्ट्रीय आयुर्विज्ञान आयोगाने रद्द केला आहे. यापुढे कोणत्याही कारणास्तव विद्यार्थ्यांना एका महाविद्यालयातून दुसऱ्या महाविद्यालयात प्रवेश घेणे शक्य होणार नाही. यामुळे विद्यार्थी व पालकांकडून नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.
राष्ट्रीय आयुर्विज्ञान आयोगाच्या जुन्या नियमानुसार एमबीबीएसची प्रथम वर्ष परीक्षा उतीर्ण झाल्यानंतर त्यांना वैद्यकीय महाविद्यालय बदलण्याची परवानगी देण्यात येत होती. मात्र वैद्यकीय परिस्थिती, एकल पालकत्त्व आणि विनंती केलेल्या वैद्यकीय महाविद्यालयातील जागांची उपलब्धता लक्षात घेऊन, तसेच अन्य वैध कारणांसह राष्ट्रीय आयुर्विज्ञान आयोग वैद्यकीय विद्यार्थ्यांना दुसऱ्या महाविद्यालयात स्थलांतरित होण्यास परवानगी देत होते. यासाठी प्रत्येक महाविद्यालयाला ५ टक्के जागांपर्यंत परवानगी दिली होती. मात्र शैक्षणिक वर्ष सुरू असताना महाविद्यालय बदलण्यास पूर्वीच्या नियमातही परवानगी देण्यात येत नव्हती. राष्ट्रीय आयुर्विज्ञान आयोगाच्या पदवी वैद्यकीय शिक्षण मंडळाने (यूजीएमईबी) नियमांमध्ये केलेल्या दुरुस्तीनुसार वैद्यकीय संस्थेमध्ये प्रवेश घेतल्यानंतर काेणत्याही कारणास्तव विद्यार्थी यापुढे अन्य कोणत्याही महाविद्यालयात प्रवेश घेऊ शकणार नाही. प्रवेशासंदर्भातील नव्या नियमाबाबत विद्यार्थी व पालकांनी निराशा व्यक्त केली आहे.
या नियमामुळे विद्यार्थ्यांना एखाद्या चांगल्या वैद्यकीय महाविद्यालयात जागा रिक्त असल्यास, त्या वैद्यकीय महाविद्यालयातून शिक्षण घेण्याची संधी हिरावली जाणार आहे. त्यामुळे यापुढे विद्यार्थ्यांना ज्या वैद्यकीय महाविद्यालयात वैद्यकीय शिक्षणासाठी प्रवेश मिळेल त्याच महाविद्यालयात त्यांना अभ्यासक्रम आणि आंतरवासिता पूर्ण करावी लागणार आहे.