मुंबई : महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाने वैद्यकीय पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रमांच्या हिवाळी सत्र २०२४ च्या परीक्षांचे वेळापत्रक नुकतेच जाहीर केले असून यामध्ये लेखी परीक्षा वेळपत्रकामध्ये एक दिवही सुट्टी न देता सलग परीक्षा घेण्यात येत आहे. विद्यापीठाच्या या निर्णयामुळे विद्यार्थ्यांकडून संताप व्यक्त करण्यात येत आहे. वैद्यकीय अभ्यासाचा ताण लक्षात घेता सलग परीक्षा घेतल्याने विद्यार्थ्यांना महिनाभर तणावाखाली राहावे लागणार आहे. त्यामुळे प्रत्येक पेपरसाठी किमान एक दिवसाची सुट्टी देण्याची मागणी विद्यार्थी व आयएमएकडून करण्यात आली आहे.
महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठातर्फे दरवर्षी उन्हाळी व हिवाळी अशा दोन सत्रामध्ये विविध अभ्यासक्रमांच्या लेखी व प्रात्यक्षिक परीक्षा घेण्यात येतात. प्रत्येक सत्रात वैद्यकीय पदवी, पदव्युत्तर पदविका, पदव्युत्तर पदवी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या लेखी परीक्षा एक दिवस आड अशा पध्दतीने घेण्यात येतात. मात्र करोनामुळे विस्कळीत झालेले परीक्षेचे वेळापत्रक नियमित करण्यासाठी राष्ट्रीय आयुर्विज्ञान आयोगाने वैद्यकीय पदवी आणि वैद्यकीय पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या लेखी व प्रात्यक्षिक परीक्षा एक महिन्याच्या आत घेण्याचे निर्देश दिले आहेत. त्यामुळे एका महिन्याच्या आत परीक्षा पूर्ण करण्यासाठी विद्यापीठाने यूजी मेडिकल – एमबीबीएस (जुने), एमबीबीएस (सीबीएमई २०१९), एमबीबीएस (सीबीएमई २०२३) व पीजी मेडिकल : एमडी, एमएस, डीएम, एमसीएच, पीजी, डिप्लोमा, एमस्सी मेडिकल (जीवरसायनशास्त्र आणि सूक्ष्मजीवशास्त्र) या अभ्यासक्रमाच्या हिवाळी २०२४ सत्रातील परीक्षा एकही दिवस सुट्टी न देता सलग (सार्वजनिक सुट्टीचे दिवस वगळून) घेण्याचा निर्णय घेतला आहे.
हेही वाचा : मुंबई: रस्त्याच्या कडेच्या भूमिगत गटारांची सीसी टीव्ही कॅमेऱ्याद्वारे पाहणी करणार
एक महिन्यांच्या आता परीक्षा पूर्ण करण्यासाठी विद्यार्थ्यांना सुट्टी न देता सलग परीक्षा घेणे हे चुकीचे आहे. वैद्यकीय विद्यार्थ्यांना परीक्षेचा प्रचंड ताण असतो. त्यामुळे सलग परीक्षा घेतल्यास विद्यार्थ्यांना महिनाभर तणावाखाली वावरावे लागणार आहे. एक दिवसाच्या अंतराने परीक्षा घेतल्यास किमान ५ ते ७ दिवस परीक्षा लांबण्याची शक्यता आहे. त्यानंतर प्रात्याक्षिक परीक्षा घेण्यासाठी १० दिवस शिल्लक राहतील, त्यामुळे एक दिवस आड परीक्षा घेतल्यास विद्यार्थ्यांच्या मनावरील ताण कमी होण्यास मदत होईल, असे विद्यार्थ्यांचे म्हणणे आहे.
हेही वाचा : येत्या दोन वर्षांत मुंबईतील रस्ते खड्डेविरहीत होणार, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा विश्वास
आयएमएकडून पुनर्विचार करण्याची विनंती
करोनामुळे विस्कळीत झालेले वेळापत्रक नियमित करण्याच्या अनुषंगाने राष्ट्रीय आयुर्विज्ञान आयोगाने हिवाळी सत्राच्या परीक्षा एका महिन्यामध्ये परीक्षा पूर्ण करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रमाचे स्वरूप लक्षात घेता एक दिवस आड परीक्षा घेतल्यास ते विद्यार्थ्यांचे हिताचे असेल आणि सलग परीक्षेमुळे येणारा ताण व मानसिक थकवा कमी होण्यास मदत होईल. दोन पेपरदरम्यान सुट्टी दिल्यास परीक्षेच्या कालावधीमध्ये फारसा फरक पडणार नाही. त्यामुळे प्रत्येक पेपरमध्ये सुट्टी देण्याची विद्यापीठाने विचार करावा, अशी विनंती इंडियन मेडिकल असोसिएशनच्या ज्युनियर डॉक्टराच्या संघटनेने विद्यापीठाला केली आहे.