सरकारकडे औषध वितरकांची ९० कोटी रूपयांची थकबाकी

राज्यातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांशी संलग्नित असलेल्या रुग्णालयांमध्ये औषधपुरवठा करणाऱ्या वितरकाचे सुमारे ९० कोटी रुपये थकीत ठेवल्याप्रकरणी औषधे आणि शस्त्रक्रियेसाठी लागणाऱ्या आवश्यक साधनांचा पुरवठा पुढील आठवडाभरात बंद करण्याचा इशारा ऑल इंडिया फूड आणि ड्रग लायसन्स होल्डर फाऊंडेशनअंतर्गत वितरकांनी दिला आहे.

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांशी संलग्नित रुग्णालयांसाठी आवश्यक औषधांचा साठा वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचलनालयामार्फत(डीएमआरई) औषध वितरकांकडून निविदांद्वारे मागविला जातो. मात्र राज्य सरकाच्या आदेशानुसार, सरकारी रुग्णालयांमध्ये लागणारा औषधांचा साठा हाफकिन बायोफार्मास्युटिकलमार्फत मागविण्यात येणार आहे. परंतु हा नवा नियम लागून होण्यापूर्वी मागविण्यात आलेल्या औषधांचे सुमारे ९० कोटी रुपये थकीत ठेवण्यात आले. मागील दोन वर्षांपासूनची थकबाकी असून यामध्ये सुमारे १०० हून अधिक वितरकांचे पैसै येणे बाकी आहे. याबाबत डीएमईआरशी वारंवार संपर्क साधून आश्वासनांव्यतिरिकत काहीही हाती न आल्याने त्रस्त झालेल्या वितरकांनी औषधे आणि शस्त्रक्रियांसाठी आवश्यक साधनांचा पुरवठा येत्या आठवडाभरात बंद करण्याचे जाहीर केले.

१ ऑक्टोबर रोजी मोर्चा

यासंबंधीची सर्व वितरकांची गुरुवारी बैठक झाली असून १ ऑक्टोबर रोजी डीएमईआर ते मंत्रालय मोर्चादेखील काढण्यात येईल, असे ऑल इंडिया फूड आणि ड्रग लायसन्स होल्डर फाऊंडेशनचे अध्यक्ष अभय पांडे यांनी सांगितले.