मुंबई : घाटकोपर येथील मे. अर्बनकेयर लाईफ साइन्सेस एल.एल.पी. या घाऊक औषध विक्रेत्याने औषधे व सौंदर्य प्रसाधने कायदा १९४० व नियम १९४५ च्या तरतुदींचा भंग केल्याप्रकरणी अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) १ एप्रिल रोजी कारवाई केली. त्यात विक्रेत्याच्या पेढीमध्ये असलेला जवळपास ६१ लाख रुपये किमतीचा औषधांचा साठा जप्त केला. जप्त केलेल्या औषधाचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत.

घाटकोपर येथील मे. अर्बनकेअर लाईफ साइन्सेस एल.एल.पी. या घाऊक औषध विक्री पेढीची घटना दोन ते तीनवेळा बदलण्यात आली. मात्र घटना बदल केल्यानंतर मे. अर्बनकेअर लाईफ साइन्सेस एल.एल.पी. या कंपनीने नवीन परवाने घेतले नाहीत. तसेच त्यासाठी अर्जही केले नाही. यासंदर्भातील माहिती अन्न व औषध प्रशासनाच्या मुंबई कार्यालयातील गुप्तवार्ता विभागास मिळाल्यावर त्यांच्या कार्यालयातील औषध निरीक्षक प्रेमदास साखरे, संदीप दातीर, रामेश्वर डोईफोडे व शितल देशमुख यांनी पेढीला भेट देऊन कागदपत्रांची तपासणी केली. यावेळी पेढीने घटना बदल केल्यानंतर अन्न व औषध प्रशासनाकडून नवीन औषध विक्री परवाने घेतले नसल्याचे लक्षात आले. यावरून पेढीच्या मालकांकडून औषधे व सौंदर्य प्रसाधने कायदा १९४० व नियम १९४५ च्या तरतुदींचा भंग केल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे अन्न व औषध प्रशासनाचे औषध निरिक्षक प्रेमदास माखरे यांनी अनेक औषधांचे नमूने तपासणीसाठी घेत जवळपास ६१ लाख ९५ हजार ८७१ रुपयांचा औषधांचा साठा जप्त केला.

अन्न व औषध प्रशासनामधील आयुक्त राजेश नार्वेकर, सह आयुक्त (दक्षता) डॉ. राहुल खाडे व सह आयुक्त (मुंबई) विजय जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली आहे. तसेच सहायक आयुक्त (गुप्तवार्ता) मुंबई वि. आर. रवि व सहायक आयुक्त बृहन्मुंबई डी. एम. दरंदळे यांनी ही कारवाई यशस्वी व्हावी यासाठी प्रयत्न केले.

दूध भेसळीवरही करडी नजर

मानखुर्द चेक नाका, दहिसर चेक नाका आणि ऐरोली चेक नाका या तीन प्रवेशद्वारांवरून शहरात प्रवेश करणाऱ्या दुधाच्या टँकरची झडती घेण्यात आली. तिन्ही प्रवेशद्वारावरून शहरात प्रवेश करणाऱ्या ७९ वाहनांमधील १ लाख ५१ हजार ८९४ लिटर इतका दुधाचा साठा तपासण्यात आला. त्यात मानखुर्द चेक नाक्यावर सर्वाधिक ५१ दुधाच्या वाहनांची तपासणी करण्यात आली. यामध्ये १ लाख ४ हजार ५३८ लिटर इतक्या दूध साठ्याची तपासणी केली. त्याखालोखाल दहिसर चेक नाका येथे १० वाहनांमधील २७ हजार ७०४ लिटर दुधाचा साठा आणि ऐरोली चेक नाका येथे १८ वाहनांमधील १९ हजार ६५२ लिटर दुधाचा साठा तपासण्यात आला.