मुंबई : रेडिओथेरपीचे दुष्परिणाम कमी करणारे औषध उपलब्ध झाल्याने कर्करोग रुग्णांना मोठा दिलासा मिळाला आहे. रेडिओथेरपी उपचारांनंतर कर्करोग रुग्णांना अनेक दुष्परिणामांना सामोरे जावे लागते. हा त्रास कमी करण्यासाठी अणुऊर्जा विभाग, भाभा अणू संशोधन केंद्र (बीएआरसी), टाटा रुग्णालय आणि आयडीआरएसतर्फे अॅक्टोसाईट हे न्यूट्रास्युटीकल औषध विकसित करण्यात आले आहे.

रेडिओथेरपीमुळे शरीरात निर्माण झालेल्या विषारी घटकांच्या दुष्परिणामापासून रक्षण करण्याबरोबरच रुग्णाची रोगप्रतिकारकशक्ती वाढविण्यासाठी हे औषध महत्त्वपूर्ण ठरणार आहे. हे औषध बाजारात उपलब्ध करण्यात आले आहे. या औषधाची किंमत १४० ते १७५ रुपये आहे.

हेही वाचा >>>म्हाडाच्या भूखंडावरील अनधिकृत जाहिरात फलक हटविण्यास अखेर सुरुवात; विलेपार्ले येथील फलक आज हटवणार

कर्करोग रुग्णांवर केमोथेरपी, रेडिओथेरपी अशा विविध पद्धतीने उपचार केले जातात. त्यातही रेडिओथेरपीचा अधिक वापर केला जातो. रेडिओथेरपीमुळे कर्करोग बरा होत असला तरी त्यानंतर केस गळणे, त्वचेवर ओरखडे उटणे, तोंड शुष्क होणे, ओटीपोटीच्या भागामध्ये दुखणे अशा अनेक समस्यांनी रुग्ण त्रस्त असतो. रुग्णांचा हा त्रास कमी करण्यासाठी अॅक्टोसाईट हे न्यूट्रास्युटीकल औषध तयार करण्यात आले आहे. बीएआरसीचे संचालक विवेक भसीन, टाटा रुग्णालयाचे संचालक डॉ. सुदीप गुप्ता, अॅक्ट्रेक्टचे संचालक डॉ. पंकज चतुर्वेदी आणि अणुऊर्जा विभागातील शास्त्रज्ञांच्या उपस्थितीमध्ये या औषधाचे अनावरण करण्यात आले. यावेळी बीएआरसीचे संचालक डॉ. विवेक भसीन यांनी शास्त्रज्ञांच्या प्रयत्नांचे कौतुक केले. अॅक्टोसाईट हे औषध पूरक अन्न म्हणून सध्या वापरण्यात येणार असून, या औषधामुळे कर्करोग रुग्णांची रोगप्रतिकारकशक्ती वाढेल आणि त्यांचे जीवनमान सुधारण्यास मदत होईल, डॉ. गुप्ता म्हणाले.

‘टाटा’ डॉक्टरांच्या मदतीने औषध

बीएआरसीच्या शास्त्रज्ञांनी क्लोरोफिलिन या रसायनावर अनेक वर्षे संशोधन करून आलेल्या परिणामांच्या आधारे टाटा रुग्णालयाच्या डॉक्टरांच्या मदतीने हे नवीन औषध तयार केले.