मुंबई : ठराविक धाटणीत न अडकता सातत्याने विविधांगी भूमिकांचा शोध घेणारे कसदार अभिनेते पंकज कपूर यांची कारकीर्द त्यांच्याच तोंडून लोकसत्ता गप्पांच्या या पर्वात ऐकता येणार आहे. गप्पांची ही मैफल रंगवण्याची धुरा सांभाळणार आहेत प्रयोगशील अभिनेत्री गीतांजली कुलकर्णी. ‘लोकसत्ता गप्पा’चा हा संवादयोग रंगणार आहे शनिवारी, १ मार्च रोजी.

अभिनयाच्या जोरावर बहुरंगी, बहुढंगी व्यक्तिरेखांसाठी ओळखले गेलेले अभिनेते म्हणून पंकज कपूर यांचे नाव घेतले जाते. ऐंशीच्या दशकात ज्यावेळी समांतर चित्रपट हे मुख्य प्रवाहातील चित्रपटांइतकेच लोकप्रिय ठरले होते, त्या काळात पंकज कपूर यांनी श्याम बेनेगल दिग्दर्शित ‘आरोहण’ या चित्रपटाद्वारे अभिनय क्षेत्रात पदार्पण केले. पुढे श्याम बेनेगल, कुंदन शाह, सईद अख्तर मिर्झा, मृणाल सेन अशा समांतर चित्रपटांचे अग्रणी समजल्या जाणाऱ्या दिग्दर्शकांबरोबर काम करताना प्रत्येक भूमिकेचे सोने करणारे पंकज कपूर यांची कारकीर्द, संघर्ष, भूमिकांच्या निवडीमागील विचार असे अनेक पैलू ‘लोकसत्ता गप्पां’मधून उलगडणार आहेत. हा गप्पांचा कार्यक्रम केवळ निमंत्रितांसाठीच राखीव आहे.

ठोस भूमिका करण्याची संधी असेल तरच काम करेन, या भूमिकेतून सातत्याने नवे काही शोधत राहिलेल्या पंकज कपूर यांनी केवळ अभिनयापुरते स्वत:ला मर्यादित ठेवले नाही. त्यांनी लेखन, दिग्दर्शनही केले. अभिनेता म्हणून सर्जकतेच्या वाटा चोखाळत असताना आपल्या वाट्याला येणाऱ्या चित्रपटातील भूमिकांचे नाविन्य टिकवण्यासाठी त्यांनी धडपड केली.

जीवनप्रवासाविषयी जाणून घेण्याची संधी

चित्रपटांबरोबरच दूरचित्रवाणी मालिकांमधूनही पंकज कपूर घरोघरी पोहोचले. विशाल भारद्वाजसारख्या सर्जनशील दिग्दर्शकाच्या चित्रपटांमधून प्रेक्षकांसमोर आले. २००४ साली प्रदर्शित झालेल्या विशाल भारद्वाज दिग्दर्शित ‘मकबूल’ चित्रपटातील अब्बाजीच्या भूमिकेसह कारकिर्दीच्या सुरूवातीच्या काळातील ‘राख’ आणि ‘एक डॉक्टर की मौत’ या दोन चित्रपटांसाठी राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार मिळवणाऱ्या पंकज कपूर यांच्या आजवरच्या जीवनप्रवासाविषयी जाणून घेण्याची संधी रसिकांना ‘लोकसत्ता गप्पां’च्या माध्यमातून मिळणार आहे.

प्रायोजक

● सहप्रायोजक : केसरी टूर्स, बीयंग आणि ठाणे भारत सहकारी बँक लिमिटेड

● पॉवर्ड बाय : एम.के. घारे ज्वेलर्स

Story img Loader