कोन, पनवेल येथील घरांचा ताबा देण्यास होणाऱ्या विलंबाबाबत न्यायालयात जाणार नाही किंवा कुठेही तकार करणार नये, असे हमीपत्र विजेते गिरणी कामगारांकडून म्हाडाचे मुंबई मंडळ घेत आहे. या प्रकरणाची अखेर मंडळाने दखल घेतली असून गिरणी कामगार संघटना आणि मुंबई मंडळ यांच्यात आज बैठक होणार आहे.
कोन येथील घरांसाठी २०१६ मध्ये सोडत काढण्यात आली. या सोडतीतील घरांचा ताबा रखडला आहे. एमएमआरडीए आणि मुंबई मंडळ यांच्यातील वादामुळे ताबा रखडला असून ताबा देण्यास आणखी विलंब होणार आहे. या पार्श्वभूमीवर मंडळाकडून हमीपत्र देण्याची सक्ती विजेत्या गिरणी कामगारांकडे केली जात आहे. या विलंबाबाबत त्यांनी न्यायालयात जाऊ नये वा कुठेही तक्रार करू नये असा आशय या हमीपत्राचा आहे.
हेही वाचा- बेवारस वाहने हटवण्याची मोहीम थंडावली ; विल्हेवाटीसाठी योग्य जागेचा मुंबई पालिकेकडून शोध
या हमीपत्राबाबतचे सविस्तर वृत्त लोकसत्ताने प्रसिद्ध केले होते. तसेच याविरोधात आंदोलनाची हाक गिरणी कामगार कृती संघटनेने दिली होती. या दोन्हीची दखल मुंबई मंडळाचे नवीन मुख्य अधिकारी मिलिंद बोरीकर यांनी घेतली आहे. त्यानुसार आज याविषयी म्हाडा भवनात बैठक होणार आहे. या बैठकीत मुख्य अधिकारी काय निर्णय घेतात याकडे आता लक्ष लागले आहे.