मुंबई : मध्य रेल्वेवरील कर्नाक उड्डाणपुलाच्या कामानिमित्त सीएसएमटी – मस्जिद रेल्वे स्थानकांदरम्यान मोठा ब्लाॅक घेण्यात आला आहे. या ब्लॉकमुळे कोकण रेल्वेवरील रेल्वेगाड्या रखडणार आहेत. २५, २६, २७ जानेवारी आणि १, २, ३ फेब्रुवारी रोजी हा ब्लाॅक घेण्यात येणार आहे. या कालावधीत कोकणातील वंदे भारत एक्स्प्रेससह जनशताब्दी, तेजस एक्स्प्रेस विलंबाने धावतील.
कोकण रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी गाडी क्रमांक १२०५२ मडगाव – सीएसएमटी जनशताब्दी एक्स्प्रेस, गाडी क्रमांक २२१२० मडगाव – सीएसएमटी तेजस एक्सप्रेस, गाडी क्रमांक १२१३४ मंगळुरू – सीएसएमटी एक्स्प्रेस या तिन्ही रेल्वेगाड्यांचा प्रवास दादर रेल्वे स्थानकापर्यंत असेल. या रेल्वेगाड्या दादर – सीएसएमटी दरम्यान धावणार नाहीत. गाडी क्रमांक २०११२ मडगाव – सीएसएमटी कोकणकन्या एक्स्प्रेस शनिवारी ३० मिनिटे विलंबाने धावेल.
रविवारी गाडी क्रमांक १२०५१ सीएसएमटी – मडगाव जनशताब्दी एक्स्प्रेस, गाडी क्रमांक २२२२९ सीएसएमटी – मडगाव वंदे भारत एक्स्प्रेस, गाडी क्रमांक २२११९ सीएसएमटी – मडगाव तेजस एक्स्प्रेसचा प्रवास सीएसएमटी येथून २० ते ३० मिनिटे विलंबाने सुरू होईल. रविवारी गाडी क्रमांक १२०५२ मडगाव – सीएसएमटी जनशताब्दी एक्स्प्रेस, गाडी क्रमांक २२१२० मडगाव – सीएसएमटी तेजस एक्स्प्रेसचा प्रवास दादर स्थानकातून सुरू होईल.