छत्रपती शिवाजी टर्मिनस यार्ड परिसरात गेल्या काही महिन्यांत सातत्याने होणाऱ्या तांत्रिक बिघाडांमागे आणि गाडय़ा घसरण्याच्या घटनांमागे अनेक तांत्रिक कारणे असली, तरी रविवारी ओव्हरहेड वायर तुटण्याच्या घटनेला डीसी-एसी परिवर्तनाचे काम कारणीभूत असल्याचे समजते. शनिवारी रात्री या परिवर्तनाच्या कामानंतर डीसी आणि एसी तारांना जोडणारा भाग व्यवस्थित जोडला न गेल्याने ही वायर तुटली असल्याची शक्यता एका वरिष्ठ अधिकाऱ्याने वर्तवली. तसेच गेल्या दोन आठवडय़ांमध्ये रुळांवरून गाडय़ा घसरण्याच्या घटनांमागेही मुंबई छत्रपती शिवाजी टर्मिनस यार्डातील रुळांची वळणदार रचना कारणीभूत असल्याचे सांगण्यात येत आहे.
रविवारी मेगाब्लॉकच्या दिवशी सकाळी सकाळी मशीद आणि मुंबई छत्रपती शिवाजी टर्मिनस या स्थानकांदरम्यान अप जलद मार्गावर ओव्हरहेड वायर तुटली होती. त्यामुळे प्रवाशांचे चांगलेच हाल झाले. ही वायर तुटण्यामागे दोन वायरींना जोडणारा एक भाग व्यवस्थित जोडला गेला नसल्याचे कारण आहे, असे रेल्वे अधिकाऱ्यांना प्रथमदर्शनी पाहणीत आढळले. सध्या या मार्गावर डीसी-एसी परिवर्तनाचे काम सुरू असून शनिवारी रात्रीही मशीद-सीएसटीदरम्यान यासाठी विशेष ब्लॉक घेण्यात आला होता.
या ब्लॉकदरम्यान काही भाग एसी प्रवाहावर परावर्तित करण्यात आला असला, तरी पुढील भाग अद्यापही डीसी प्रवाहावरच आहे. या दोन विद्युतप्रवाहांवर गाडी चालवणे आव्हानात्मक असून त्यासाठी या दोन्ही प्रवाहांच्या वायरींना एकमेकींपासून विलग ठेवून विद्युतप्रवाह कायम ठेवणारा एक भाग व्यवस्थित बसवणे महत्त्वाचे असते. मात्र नेमका हाच भाग व्यवस्थित बसला नसावा, असे या वरिष्ठ अधिकाऱ्याचे म्हणणे आहे. याबाबत अधिक चौकशी करण्यात येत आहे.
गेल्या रविवारी हार्बर मार्गावर लोकलचा एक डबा रुळावरून घसरला होता. पंधरवडाभरात सीएसटी यार्डात अशा प्रकारची ही दुसरी घटना होती. सीएसटी परिसरात गाडय़ा स्थानकात शिरण्यासाठी रेल्वेरूळ वळणदार आहेत. हे वळण ७.५ अंश एवढे आहे. जगभरात जास्तीत जास्त ८ अंश एवढय़ा वळणावरून गाडय़ा वळतात. एवढे वळणही धोकादायक असते. तसेच या यार्ड भागात अनेक ठिकाणी रूळ जोडलेले आहेत. दिवसाला जास्तीत जास्त १५-२० गाडय़ा जाणे, ही अशा जोडलेल्या रुळांसाठी योग्य परिस्थिती असते. मात्र या ठिकाणी दिवसाला किमान २०० गाडय़ा या जोडणीवरून जातात. त्यामुळेही रुळावरून गाडी घसरण्याची शक्यता आहे.
डीसी-एसी परिवर्तनातील कामामुळेच ‘मेगाताप’
छत्रपती शिवाजी टर्मिनस यार्ड परिसरात गेल्या काही महिन्यांत सातत्याने होणाऱ्या तांत्रिक बिघाडांमागे आणि गाडय़ा घसरण्याच्या घटनांमागे अनेक तांत्रिक कारणे असली,

First published on: 23-09-2014 at 04:43 IST
Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Mega block due to dc ac conversion work