मुंबई : विविध तांत्रिक कामांसाठी येत्या रविवारी, ६ नोव्हेंबर रोजी मध्य रेल्वेच्या सीएसएमटी-विद्याविहार दरम्यान अप आणि डाऊन धीम्या मार्गावर, हार्बरवर पनवेल-वाशी दोन्ही मार्गावर मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. तर, पश्चिम रेल्वेवर शनिवारी मध्यरात्री बोरिवली ते भाईंदर स्थानकादरम्यान अप व डाऊन धिम्या मार्गावर ब्लॉक आहे. त्यामुळे या मार्गावर रविवार मेगा ब्लॉक नसेल, अशी माहिती पश्चिम रेल्वेने दिली. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस सीएसएमटी-विद्याविहारदरम्यान दोन्ही धिम्या मार्गावर सकाळी १०.५५ ते दुपारी ३.५५ पर्यंत मेगा ब्लॉक आहे.
हेही वाचा >>> मुंबई : जे.जे.रुग्णालयात सापडला भुयारी मार्ग
त्यामुळे (सीएसएमटी) येथून सकाळी १०.४८ ते दुपारी ३.४९ या वेळेत सुटणाऱ्या धिम्या लोकल सीएसएमटी आणि विद्याविहारदरम्यान डाऊन जलद मार्गावर वळवण्यात येणार आहेत. त्यामुळे लोकल भायखळा, परळ, दादर, माटुंगा, शीव आणि कुर्ला स्थानकांवर थांबतील आणि पुढे पुन्हा डाऊन धिम्या मार्गावर वळवण्यात येतील. घाटकोपर येथून सकाळी १०.४१ ते दुपारी ३.५२ या वेळेत सुटणाऱ्या अप धिम्या मार्गावरील लोकल विद्याविहार ते सीएसएमटी दरम्यान अप जलद मार्गावर वळवण्यात येणार आहे. हार्बरच्या पनवेल-वाशी मार्गावर सकाळी ११.०५ ते सायंकाळी ४.०५ पर्यंत मेगा ब्लॉक आहे. त्यामुळे ब्लॉक काळात सीएसएमटी-पनवेल, बेलापूर दरम्यानच्या लोकल फेऱ्या रद्द करण्यात आल्या आहेत. तसेच सकाळी ११.०२ ते दुपारी ३.५३ पर्यंत ठाणे ते पनवेल ट्रान्स हार्बरवरील लोकल फेऱ्याही रद्द करण्यात आल्या आहेत. तर, ठाणे-वाशी, नेरुळ लोकल फेऱ्या उपलब्ध राहतील.