* राज्यात सरींचा जोर आजही कायम राहणार
* मध्य रेल्वेच्या ३४० फेऱ्या रद्द
* रस्ते वाहतुकीवरही परिणाम
आठवडाभर स्तुतिसुमने वाहिलेल्या मुंबईकरांचे ‘पाऊस कौतुक’ रविवारी आटण्यास सुरुवात झाली. सुटीच्या दिवशी फिरायला बाहेर पडणाऱ्या मुंबईकरांच्या वाटेत या रविवारी पावसाचा ‘मेघा’ब्लॉक आडवा आला. हा ‘मेघा’ब्लॉक फक्त रेल्वेमार्गापुरताच मर्यादित न राहता त्याने मुंबईतील रस्तेही व्यापून टाकले. परिणामी मुंबईकरांचा रविवार पाण्यात गेला, मात्र सुटीचा दिवस असल्याने चाकरमान्यांचे हाल टळले. तुफान पावसामुळे मध्य रेल्वेची सेवा संपूर्ण मोडकळीस आल्याने ‘मरे’च्या ३४० फेऱ्या रद्द झाल्या. त्याचबरोबर शहर व उपनगरे येथील मोक्याच्या ठिकाणी रस्त्यांवर पाणी तुंबल्याने रस्ते वाहतूकही अत्यंत धीम्या गतीने सुरू होती.
* पाऊसफुल्ल!
नैर्ॠत्य मान्सून सक्रिय झाल्याने गेल्या दोन दिवसांपासून संपूर्ण राज्यात पावसाने दमदार हजेरी लावली आहे. गेल्या २४ तासांत कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्रातील काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडत आहे. मुंबईला रविवारी पावसाने झोडपले असून उपनगरी वाहतूक आणि जनजीवन अतिवृष्टीने काही प्रमाणात हलवून सोडले. पेण व लोणावळा येथे २६० मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. येत्या २४ तासांत पावसाचा जोर कायम राहील, असा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.
दक्षिण-पूर्व मध्य प्रदेशाच्या लगत असलेले कमी दाबाचे क्षेत्र पश्चिम मध्य प्रदेश आणि पूर्व राजस्थानच्या भागावर आले. त्याच बरोबर गुजरात किनारपट्टीपासून ते केरळ किनारपट्टीपर्यंतचा कमी दाबाचा पट्टा कायम असल्यामुळे राज्यात मान्सून सक्रिय झाला आहे. त्यामुळे येत्या २४ तासांत कोकण, गोवा व मध्य महाराष्ट्रात पासवाचा जोर असाच राहण्याची शक्यता आहे, तर मराठवाडा आणि विदर्भात अधूनमधून जोरदार सरी पडतील असा अंदाज आहे. गेल्या २४ तासांत कोकण, गोवा, घाटमाथा आणि पश्चिम महाराष्ट्रात मुसळधार पाऊस झाला आहे.
* आकडेसरी
शनिवारी सकाळी ते रविवारी सकाळी साडेआठपर्यंत ताम्हिणी २५०, खोपोली २३०, कोयना १७०, महाबळेश्वर २३०, भोर १००, वेल्हे १२०, पुणे ७०, इगतपुरी ६०, दापोली २३०, भिरा २२०, खालापूर २०, कर्जत १९०, गुहागर १८०, रोहा १६०, मुंबई (कुलाबा) १६०, चिपळूण १३०, रत्नागिरी १२०, अलिबाग ९०, कणकवली ६०, वर्धा १२०, नागपूर ६०, अकोला ३०, िहगोली २० मिलिमीटर पावसाची नोंद झाली.
* पाताळगंगा नदीला पूर!
रायगड जिल्ह्य़ात अतिवृष्टीमुळे पाताळगंगा नदीला पूर आला, त्यामुळे आपटा गावाचा संपर्क तुटला. खोपोली शिळफाटा येथे पाणी साचल्याने मुंबई-पुणे महामार्गावरील वाहतूक द्रुतगती मार्गावर वळवण्यात आली. रोहा तालुक्यातील निडी येथे एका घरावर दरड कोसळल्याने या परिसरातील लोकांना सुरक्षित स्थळी स्थलांतरित करण्यात आले.
* ‘मान्सून वेढा’
नैॠत्य मान्सूनने रविवारी संपूर्ण देश व्यापला आहे. संपूर्ण देश व्यापण्यासाठी मान्सूनला साधारण १५ जुलै लागत असतो. मात्र, यंदा एक महिना अगोदरच मान्सूने संपूर्ण देश व्यापला आहे. अंदमान निकोबार बेटावर १७ मे रोजी मान्सून दाखल होता. त्यानंतर त्याने वेगाने प्रवास करत १ जून रोजी संपूर्ण केरळ व्यापत कर्नाटकात दाखल झाला होता. रविवारी मान्सूनने संपूर्ण हरयाणा, चंदिगढ, दिल्ली, राजस्थान आणि देशाचा राहिलेला सर्व भाग व्यापल्याचे हवामान विभागाने जाहीर केले.