पश्चिम रेल्वेच्या नायगाव स्थानकाजवळ भुयारी मार्गाचे काम सुरू असून गुरुवार, शुक्रवार आणि शनिवारच्या मध्यरात्री वसई रोड ते भाइंदर दरम्यान जम्बो ब्लॉक करण्यात येणार आहे. यामुळे काही उपनगरी गाडय़ांच्या फेऱ्या रद्द करण्यात आल्या असून मेल-एक्स्प्रेस गाडय़ा १० ते १५ मिनिटे उशीराने धावणार असल्याचे रेल्वे सूत्रांनी सांगितले.
नायगाव रेल्वे स्थानकाजवळ पूर्व आणि पश्चिम भागाला जोडण्यात येणारा भुयारी मार्ग बांधण्याचे काम वेगात सुरू असून गेल्या आठवडय़ामध्ये चार रात्री जम्बो ब्लॉक करण्यात आला होता. आता पुन्हा गुरुवार-शुक्रवारच्या रात्री ११.१५ ते पहाटे ५.१५ आणि शुक्रवार-शनिवारच्या रात्री ११.५५ ते पहाटे ६.२५ वाजेपर्यंत उपगनरी गाडय़ांची वाहतूक बंद ठेवण्यात येणार आहे. गुरुवार-शुक्रवारी वसई रोड ते भाइंदर दरम्यान धीम्या अप (चर्चगेटच्या दिशेने) आणि जलद डाऊन (विरारच्या दिशेने) तर शुक्रवार-शनिवारी जलद अप आणि जलद डाऊन मार्गावर ब्लॉक करण्यात येणार आहे.
रद्द आणि बदल करण्यात आलेल्या गाडय़ा
७-८ फेब्रुवारीस वसई रोड-बोरिवली (११.१०), अंधेरी-विरार (११.१५), वसई रोड-बोरिवली (११.२०), बोरिवली-विरार (११.५५), बोरिवली-विरार १५ डबा (४.४०) आणि विरार-चर्चगेट (५.३०) या गाडय़ा रद्द करण्यात येणार आहेत. बोरिवलीसाठी अंधेरीहून ९.१० वाजता सुटणारी आणि चर्चगेट येथून ९.५७ वाजता सुटणारी गाडी विरापर्यंत जाणार आहे. ८-९ फेब्रुवारीस वसई रोड-बोरिवली (११.२०), बोरिवली-विरार (११.५५), बोरिवली-विरार १५ डबा (४.४०) आणि विरार-चर्चगेट (५.३०) या गाडय़ा रद्द करण्यात येणार आहेत. बोरिवलीसाठी चर्चगेट येथून ९.५७ वाजता सुटणारी गाडी विरापर्यंत जाणार आहे.

Story img Loader