मुंबई : मध्य रेल्वेच्या नाहूर आणि मुलुंड स्थानकांदरम्यान दोन तुळया (गर्डर) टाकण्यासाठी शनिवार – रविवारी सहा रेल्वे मार्गिकांवर पॉवर ब्लॉक घेण्यात येणार आहे. ब्लॉक कालावधीतील सर्व लोकल सेवा रद्द करण्यात येणार आहेत. तर अनेक मेल – एक्स्प्रेस गाड्यांच्या वेळापत्रकावर परिणाम होणार आहे.

नाहूर आणि मुलुंडदरम्यान उड्डाणपुलाचे (आरओबी) रूंदीकरण करण्यात येत आहे. रुंदीकरणासाठी एकूण १४ तुळया टाकण्यात येणार आहेत. यापैकी दोन तुळया टाकण्यासाठी पहिला ब्लॉक शनिवारी रात्री १.२० ते रविवारी पहाटे ४. ३० वाजेपर्यंत घेण्यात येणार आहे. हा ब्लॉक पाचव्या आणि सहाव्या मार्गिकेवर मुलुंड आणि विक्रोळी दरम्यान अप आणि डाऊन जलद आणि धीम्या मार्गावर असणार आहे.

हेही वाचा >>> आम्हाला मविआ आणि ‘इंडिया’त येण्यापासून कोण रोखतंय? वंचितचा अशोक चव्हाणांना सवाल, म्हणाले…

ब्लॉक कालावधीत लोकल रद्द

ब्लॉक कालावधीत सर्व लोकल सेवा रद्द करण्यात आल्या आहेत. ब्लॉकपूर्वी सीएसएमटी येथून कल्याणच्या दिशेने शेवटची लोकल रात्री १२.२४ वाजता सुटणार आहे. तर, कल्याणहून सीएसएमटीच्या दिशेने शेवटची लोकल वेळापत्रकानुसार धावणार आहे. ब्लॉकनंतर कल्याणहून सीएसएमटीकडे जाणारी पहिली लोकल कल्याणहून रात्री ३.५८ वाजता सुटेल.

ठाणे स्थानकावर ब्लॉक

ठाणे स्थानकाच्या सीएसएमटी दिशेकडे पाच मीटर रुंद पादचारी पुलाच्या चार तुळया उभारण्यासाठी शनिवारी रात्री ११.३५ ते रविवारी पहाटे ४.३५ वाजेपर्यत ब्लॉक घेण्यात आलेला आहे. हा ब्लॉक फलाट क्रमांक ८ आणि ९ अप आणि डाऊन ट्रान्सहार्बर मार्गावर आणि सहाव्या मार्गिकेवर घेण्यात येणार आहे. त्यामुळे ब्लॉक कालावधीत ठाणे ते वाशी दरम्यान धावणाऱ्या काही लोकल रद्द करण्यात येणार आहेत.

हेही वाचा >>> पाच लाखांची लाच स्वीकारताना जीएसटी अधिक्षकाला अटक; शोध मोहिमेत ४२ लाख ७० हजार रुपयांची रोख जप्त, सीबीआयची कारवाई

रविवारी मध्य, हार्बर मार्गावर मेगाब्लॉक

मुंबई : उपनगरीय रेल्वे मार्गाच्या देखभाल आणि दुरुस्तीसाठी रविवारी ब्लॉक घेण्यात आला आहे. मध्य रेल्वेवर माटुंगा ते मुलुंड अप आणि डाऊन जलद मार्गावर, हार्बर मार्गावर कुर्ला ते वाशीदरम्यान अप आणि डाऊन मार्गावर मेगाब्लॉक असेल. या ब्लॉकमुळे हार्बर मार्गावरील प्रवाशांना रविवारी सकाळी १० ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत ट्रान्सहार्बर मार्गावरून प्रवास करण्याची परवानगी देण्यात आली आहे, असे मध्य रेल्वे प्रशासनाकडून सांगण्यात आले. तर, पश्चिम रेल्वेवर शनिवारी रात्रकालीन ब्लॉक असेल.

मध्य रेल्वे

कुठे : माटुंगा ते मुलुंड अप आणि डाऊन जलद मार्गावर

कधी : सकाळी ११.०६ ते दुपारी ३.५५

परिणाम : ब्लॉक कालावधीत जलद मार्गावरील लोकल सेवा धिम्या मार्गावरून चालविण्यात येतील. परिणामी लोकल निर्धारित वेळेपेक्षा १५ ते २० मिनिटे उशिराने धावणार आहेत.

हार्बर मार्ग

कुठे : हार्बर मार्गावर कुर्ला ते वाशीदरम्यान अप आणि डाऊन मार्गावर

कधी : सकाळी ११.१० ते दुपारी ४.१० पर्यंत

परिणाम : ब्लॉक कालावधी कुर्ला ते वाशी दरम्यानची लोकल सेवा पूर्णपणे बंद असेल. प्रवाशांच्या सोयीसाठी सीएसएमटी ते कुर्ला आणि पनवेल ते वाशी दरम्यान विशेष लोकल चालवण्यात येतील.

पश्चिम रेल्वे

कुठे : बोरिवली ते भाईंदर अप धीम्या मार्गावर आणि डाऊन जलद मार्गावर

कधी : शनिवारी रात्री १२.४० ते रविवारी पहाटे ४.४० वाजेपर्यंत चार तासांचा ब्लॉक परिणाम : पश्चिम रेल्वेवरील अप धीम्या मार्गावरील सर्व लोकल विरार/वसई रोड ते बोरिवलीदरम्यान अप जलद मार्गावर आणि गोरेगाव ते वसई रोड/विरार स्थानकांदरम्यान डाऊन जलद मार्गावर चालवण्यात येतील.

Story img Loader