मुंबई : येत्या रविवारी मुंबई उपनगरीय रेल्वेच्या तिन्ही मार्गांवरील धीम्या मार्गांवर मेगाब्लाॅक घेण्यात येणार आहे. मध्य रेल्वेवरील माटुंगा आणि ठाण्यादरम्यान दोन्ही धीम्या मार्गावर, हार्बरवर सीएसएमटी-चुनाभट्टी, वांद्रे अप आणि डाऊन मार्गावर, तसेच सांताक्रुझ-गोरेगावदरम्यान दोन्ही धीम्या मार्गावर मेगाब्लाॅक असणार आहे.
माटुंगा आणि ठाण्यादरम्यान दोन्ही धीम्या मार्गावर सकाळी ११.०५ ते दुपारी ३.४५ वाजेपर्यंत मेगाब्लाॅक घेण्यात येणार असल्याने सीएसएमटीहून सुटणाऱ्या धीम्या लोकल माटुंगा आणि ठाण्यादरम्यान जलद मार्गावरून धावतील. त्यामुळे शीव, कुर्ला, घाटकोपर, विक्रोळी, भांडुप, मुलुंड, ठाणे स्थानकांत थांबा मिळाल्यानंतर ही गाडी पुन्हा डाऊन धीम्या मार्गावर वळवण्यात येणार आहे. तर कल्याणहून सीएसएमटीला जाणाऱ्या लोकलही ब्लाॅककाळात ठाणे-माटुंगादरम्यान जलद मार्गावर धावतील. मध्य रेल्वेच्या मुख्य मार्गावरील लोकल १५ मिनिटे विलंबाने धावतील.
हेही वाचा : आरे कारशेडप्रकरणी २७ सप्टेंबर रोजी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी
हार्बरवर सीएसएमटी-चुनाभटटी, वांद्रे स्थानकादरम्यान दोन्ही मार्गांवर सकाळी ११.१० ते दुपारी ४.४० वाजेपर्यंत ब्लाॅक घेण्यात येणार आहे. त्यामुळे या मार्गावरील लोकलच्या फेऱ्या रद्द करण्यात आल्या आहेत. कुर्ला आणि पनवेलदरम्यान दर २० मिनिटानंतर विशेष लोकल फेऱ्या प्रवाशांना उपलब्ध होणार आहेत.पश्चिम रेल्वेवरही रविवारी सांताक्रुझ-गोरेगावदरम्यान दोन्ही धीम्या मार्गावर सकाळी १० ते दुपारी ३ या वेळेत जम्बोब्लाॅक असणार आहे. त्यामुळे दोन्ही धीम्या मार्गांवरील लोकल सांताक्रुझ-गोरेगाव स्थानकादरम्यान जलद मार्गावर वळवण्यात येतील. धीम्या मार्गावरील लोकल गाड्यांना राम मंदिर स्थानकात थांबा नसेल.