मध्य रेल्वे मार्गावर परळ टर्मिनसचे काम सुरू असल्याने आणि पश्चिम रेल्वे मार्गावर सिग्नलिंग यंत्रणा, ओव्हरहेड वायरची देखभाल करण्यासाठी आज मध्य आणि पश्चिम मार्गावर मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. याचा परिणाम अनेक लांब पल्ल्यांच्या एकस्प्रेस गाड्यांवर झाला असून परिणामी गाडी क्रमांक ११०१० आणि ११००९ पुणे-मुंबई-पुणे सिंहगड एक्स्प्रेस, गाडी क्रमांक २२१०२ आणि २२१०१ मनमाड-मुंबई-मनमाड राज्यराणी एक्स्प्रेस, गाडी क्रमांक १२११० आणि १२१०९ मनमाड-मुंबई-मनमाड पंचवटी एक्स्प्रेस, गाडी क्रमांक १२१२४ आणि १२१२३ पुणे-मुंबई-पुणे डेक्कन क्वीन एक्स्प्रेस रद्द करण्यात आल्या आहेत.
भायखळा ते माटुंगा डाऊन धीम्या मार्गावर सकाळी ९ वाजेपासून संध्याकाळी ६ वाजेपर्यंत मेगाब्लॉक घेण्यात आला आहे.या दरम्यान सीएसएमटीहून सकाळी ८ वाजून ४९ मिनिटांपासून ते ५ वाजून ४८ मिनिटांपर्यंत भायखळा येथून माटुंग्याकडे जाणाऱ्या धीम्या मार्गावरील वाहतूक जलद मार्गावर वळविण्यात येणार आहे. या लोकल भायखळा, परळ, दादर, माटुंगा या स्थानकांवर थांबतील. या लोकलला चिंचपोकळी, करीरोड या स्थानकांवर थांबा मिळणार नसून परळ स्थानकावरील फलाट क्रमांक ३ वर थांबविण्यात येतील. दुसरीकडे हार्बर रेल्वेवर कोणताही ब्लॉक नसल्याने हार्बर मार्गावरील प्रवाशांना दिलासा मिळणार आहे.
पश्चिम रेल्वे मार्गावरील सिग्नलिंग यंत्रणा आणि ओव्हरहेड वायरची देखभाल करण्यासाठी रविवारी सकाळी ११ ते दुपारी ३ वाजेपर्यंत बोरीवली ते भाईंदर स्थानकांदरम्यान अप आणि डाऊन जलद मार्गावर जम्बोब्लॉक घेण्यात येणार आहे. ब्लॉक काळात चर्चगेट दिशेकडे जाणाºया सर्व जलद लोकल विरार, वसई रोड ते बोरीवलीपर्यंत धिम्या मार्गावरून वळविण्यात येतील. तसेच विरार दिशेकडे जाणाºया जलद लोकल बोरीवली ते वसई रोड, विरारपर्यंत धिम्या मार्गावरून चालविण्यात येतील.