ठाणे येथील रेल्वे यार्डाचे नूतनीकरण, रूट रिले इंटरलॉकींग आणि कल्याण-ठाणे/लोकमान्य टिळक टर्मिनस या मार्गाच्या विद्युतीकरणातील बदलांसाठी २९ डिसेंबरपासून ३१ डिसेंबपर्यंत ११.४५ तासांचा आणि १६ तासांचा विशेष ब्लॉक करण्यात येणार आहे. यामुळे अनेक उपनगरी गाडय़ा रद्द करण्यात आल्या आहेत, तर काही लांब पल्ल्याच्या गाडय़ांसह उपनगरी गाडय़ाही वळविण्यात आल्या आहेत. यामुळे मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
२९ डिसेंबरला रात्री ९.१५ वाजल्यापासून ३० डिसेंबरला सकाळी नऊ वाजेपर्यंत (११ तास ४५ मिनिटे) कल्याणच्या दिशेने जलद मार्गावर (पाचव्या मार्गावर) ब्लॉक करण्यात आला आहे. त्यामुळे लोकमान्य टिळक टर्मिनसवरून सुटणाऱ्या सर्व मेल-एक्स्प्रेस गाडय़ा विद्याविहार येथून जलद मार्गावर (उपनगरी जलद) वळविण्यात आल्या आहेत. रात्री ८.३५ वाजल्यानंतर सुटणाऱ्या सर्व जलद उपनगरी तसेच मेल/एक्स्प्रेस गाडय़ा ठाणे ते दिवा दरम्यान धीम्या मार्गावरून जातील. ठाण्याच्या फलाट क्रमांक दोनवर येणाऱ्या मेल/एक्स्प्रेस गाडय़ांना दोन वेळा थांबा देण्यात आला आहे. कल्याणहून छत्रपती शिवाजी टर्मिनसकडे सकाळी ६.४५ ते नऊ वाजेपर्यंत येणाऱ्या सर्व जलद गाडय़ा दिवा ते मुलुंड दरम्यान धीम्या मार्गावर वळविण्यात आल्या आहेत. यामुळे शनिवारी रात्री ११.४५ पासून पहाटे २.३० पर्यंत कल्याण ते कर्जत दरम्यानच्या गाडय़ा रद्द करण्यात आल्या आहेत.
या काळात प्रवाशांची होणारी गैरसोय लक्षात घेऊन कल्याण ते कर्जत दरम्यान शटल सेवा दर एक तासाने चालविण्यात येणार आहेत. या ब्लॉकमुळे २९ डिसेंबरच्या रात्री १०.५५ वाजता मुंबईहून सुटणारी विजापूर पॅसेंजर आणि ३० डिसेंबरच्या पहाटे ४.१० वाजता मुंबईकडे येणारी पंढरपूर पॅसेंजर रद्द करण्यात आली आहे.
मुलुंड आणि कळवा दरम्यान दोन्ही दिशेने धीम्या मार्गावर ३० डिसेंबर रोजी सकाळी १० वाजल्यापासून ३१ डिसेंबर रोजी पहाटे दोन वाजेपर्यंत (१६ तास) ब्लॉक घेण्यात आला आहे. यामुळे सकाळी ९.५० पासून ब्लॉक पूर्ण होईपर्यंत मुलुंड ते कल्याणपर्यंतची वाहतूक जलद मार्गावरून सुरू राहील.
कसारा ते कल्याण दरम्यान ३० डिसेंबर रोजी दोन्ही दिशेची वाहतूक सकाळी ११.२५ ते दुपारी ३.३७ पर्यंत बंद राहणार आहे. या काळात प्रवाशांच्या सोयीसाठी शटल सेवा चालविण्यात येणार आहे. दादर येथून सकाळी ११.३० वाजता कसारासाठी शटल सुटेल. ती कल्याण येथे दुपारी १२.३० आणि कसारा येथे दोन वाजता पोहोचेल. कल्याण येथून २.३० वाजता सुटणारी शटल कसारा येथे चार वाजता पोहोचेल. आसनगाव येथून कल्याणसाठी १.३० वाजता आणि कसारा येथून दादरसाठी २.१५ वाजता शटल सोडण्यात येणार आहे.   

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा