अभियांत्रिकी कामानिमित्त रविवारी मध्य रेल्वेवर नाहूर ते माटुंगा, हार्बर मार्गावर मानखुर्द ते नेरूळ आणि पश्चिम मार्गावर महालक्ष्मी ते सांताक्रूझ दरम्यान मेगा ब्लॉक करण्यात येणार आहे.
सकाळी १०.५८ ते दुपारी ३.१० वाजेपर्यंत मध्य रेल्वेच्या मुलुंड आणि माटुंगा स्थानकादरम्यान धीम्या मार्गावर काम करण्यात येणार आहे. त्यामुळे या मार्गावरील वाहतूक जलद मार्गावर वळविण्यात आली असून मुंबईकडे येणाऱ्या गाडय़ा नाहूर, कांजुरमार्ग आणि विद्याविहार स्थानकांवर थांबणार नाहीत. प्रवाशांनी पुढील स्थानकावर उतरून प्रवास करण्याची परवानगी देण्यात आली आहे. हार्बर मार्गावर मानखुर्द ते नेरूळ दरम्यान दोन्ही दिशेची वाहतूक सकाळी ११ ते दुपारी चार वाजेपर्यंत बंद ठेवण्यात येणार आहे. या काळात छत्रपती शिवाजी टर्मिनस ते मानखुर्द आणि ठाणे ते पनवेल दरम्यान विशेष गाडय़ा चालविण्यात येतील. प्रवाशांना सकाळी १० ते सायंकाळी सहा वाजेपर्यंत ट्रान्स हार्बर आणि मेन लाईनने प्रवास करण्याची परवानगी देण्यात आली आहे. पश्चिम मार्गावर सकाळी १०. ३५ ते दुपारी ३.३५ वाजेपर्यंत महालक्ष्मी ते सांताक्रूझ दरम्यान धीम्या मार्गावर काम करण्यात येणार आहे. त्यामुळे सर्व वाहतूक जलद मार्गावर वळविण्यात आली असून महालक्ष्मी, एल्फिन्स्टन रोड आणि माटुंगा रोड या स्थानकांवर गाडय़ा थांबणार नाहीत. लोअर परळ, माहीम जंक्शन आणि खार रोड येथे १२ डब्यांच्या गाडय़ा दोन वेळा थांबविण्यात येतील. या काळात खार रोड आणि वांद्रे दरम्यान असलेले लेव्हल क्रॉसिंग क्रमांक १९ बंद ठेवण्यात येणार आहे.

Story img Loader