या रविवारी मध्य, पश्चिम आणि हार्बर अशा तीनही मार्गावर महत्त्वपूर्ण अभियांत्रिकी कामासाठी मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. मध्य रेल्वेवर मुलुंड ते माटुंगा अप जलद मार्गावर, हार्बर मार्गावर पनवेल ते नेरुळ दोन्ही मार्गावर आणि पश्चिम रेल्वेवर चर्चगेट ते मुंबई सेंट्रल या स्थानकांदरम्यान अप व डाऊन जलद मार्गावर मेगाब्लॉक असेल.
मध्य रेल्वेवर मुलुंड ते माटुंगा या दरम्यान अप जलद मार्गावर होणारा मेगाब्लॉक सकाळी ११.३० ते दुपारी ३.३० या दरम्यान घेण्यात येईल. या दरम्यान ठाण्याहून सकाळी ११.२१ ते दुपारी ३.२५ या दरम्यान सुटणाऱ्या सर्व जलद गाडय़ा मुलुंड आणि माटुंगा या दरम्यान अप धीम्या मार्गावरून जातील.   मुंबई छत्रपती शिवाजी टर्मिनसहून सकाळी ११.१५ ते दुपारी २.५१ या दरम्यान सुटणाऱ्या सर्व डाऊन जलद गाडय़ा घाटकोपर, विक्रोळी, भांडुप आणि मुलुंड या स्थानकांवर थांबतील. या दरम्यान सर्व धीम्या गाडय़ा त्यांच्या रविवारच्या वेळापत्रकानुसारच धावतील. मात्र सर्वच गाडय़ा १५ ते २० मिनिटे उशिराने धावतील.
हार्बर मार्गावर सकाळी ११.०० ते दुपारी ३.०० या दरम्यान पनवेल ते नेरुळ या दरम्यान मेगाब्लॉक घेण्यात येईल. पनवेलहून सकाळी १०.४३ ते दुपारी ३.२७ या कालावधीत मुंबईच्या दिशेने रवाना होणाऱ्या नेरुळहून रवाना होतील, तर सकाळी १०.४१ ते दुपारी २.१७ या दरम्यान नेरुळहून पनवेल व बेलापूरच्या दिशेने एकही गाडी जाणार नाही.  ट्रान्स हार्बर मार्गावर पनवेलहून सकाळी ११.०५ ते दुपारी ३.१९ या दरम्यान ठाण्याकडे येणाऱ्या सर्व गाडय़ा नेरुळहून रवाना होतील. ठाण्याहून पनवेलकडे निघालेल्या गाडय़ा सकाळी ११.४२ ते दुपारी २.४८ या दरम्यान नेरुळच्या पुढे जाणार नाहीत. पश्चिम रेल्वेवर चर्चगेट ते मुंबई सेंट्रल या दरम्यान अप व डाऊन जलद मार्गावर सकाळी १०.३५ ते दुपारी ३.३५ या कालावधीत मेगाब्लॉक घेण्यात येईल. या कालावधीत अप व डाऊन जलद मार्गावरील गाडय़ा अप व डाऊन धीम्या मार्गावरून चालवण्यात येतील. त्यामुळे काही जलद व काही धीम्या गाडय़ा रद्द करण्यात येतील.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा