मुंबई : विविध कामांनिमित्त रविवारी १९ जानेवारीला मध्य रेल्वे मुख्य मार्गावरील मुलुंड ते माटुंगा अप धीमा मार्ग, हार्बरवर पनवेल ते वाशी दोन्ही मार्गावर मेगाब्लॉक असेल. हार्बरवरील लोकल फेऱ्या रद्द करण्यात आल्या आहेत. पश्चिम रेल्वेवर रविवारी ब्लॉक नसेल. माटुंगा रोड ते मुंबई सेन्ट्रल दरम्यान अप जलद मार्ग व पाचव्या मार्गावर ब्लॉक घेण्यात येणार आहे.
मध्य रेल्वे-मुख्य मार्ग
मुलुंड ते माटुंगा अप धीमा मार्गावर
स.११.३० ते सायं. ४ या वेळेत ब्लॉक घेण्यात येणार आहे. या काळात ब्लॉककाळात मुलुंड ते माटुंगा दरम्यान लोकल गाडय़ा अप जलद मार्गावर वळवण्यात येतील. मुलुंड, भांडुप, विक्रोळी, घाटकोपर, कुर्ला, सायन स्थानकात लोकल गाडय़ा थांबणार आहेत. लोकल पंधरा ते वीस मिनिटे उशिराने धावतील.
हार्बर मार्ग
पनवेल ते वाशी दोन्ही मार्गावर स.११.३० ते सायं. ४ वाजेपर्यंत ब्लॉक घेण्यात येईल. या काळात सीएसएमटी ते पनवेल, बेलापूर दरम्यानच्या लोकल फेऱ्या आणि ठाणे ते पनवेल ट्रान्स हार्बरवर, बेलापूर ते खारकोपर आणि पनवेल ते अंधेरी दरम्यानच्याही लोकल फेऱ्या रद्द करण्यात आल्या आहेत. ठाणे ते वाशी, नेरुळ दरम्यानच्या फेऱ्या चालवण्यात येणार आहेत.
पश्चिम रेल्वे
माटुंगा रोड ते मुंबई सेन्ट्रल दरम्यान अप जलद मार्ग व पाचवा मार्गावर १८ जानेवारी रोजी रा.११.४५ ते प.३.४५ वाजेपर्यंत ब्लॉक घेण्यात येणार आहे. परिणामी सांताक्रुझ ते चर्चगेट स्थानकादरम्यान अप जलद मार्गावरील लोकल अप धीम्या मार्गावर वळवण्यात येतील.