उपनगरी रेल्वे मार्गावरील अभियांत्रिकी तसेच विद्युतीकरणाच्या कामासाठी रविवारी, ३१ मार्च रोजी मध्य रेल्वेवर पाच तर हार्बर रेल्वेवर चार तासांचा मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे. पश्चिम रेल्वेवर वांद्रे टर्मिनस आणि वांद्रे यार्ड दरम्यान रविवार रात्री ११ ते सोमवार पहाटे चार वाजेपर्यंत ब्लॉक आहे.
मध्य रेल्वेवर माटुंगा आणि मुलुंड स्थानकांदरम्यान सकाळी १०.१५ ते दुपारी ३.१५ पर्यंत जलद मार्गावर ब्लॉक घेण्यात येणार असल्याने सर्व वाहतूक धीम्या मार्गावर वळविण्यात येणार आहे. छत्रपती शिवाजी टर्मिसकडे येणाऱ्या जलद मार्गावरील गाडय़ांना त्यांच्या नियमित थांब्याव्यतिरिक्त मुलुंड, भांडुप, विक्रोळी, घाटकोपर आणि कुर्ला स्थानकांवर थांबे देण्यात आले आहेत.
हार्बर मार्गावर मानखुर्द आणि नेरूळ दरम्यान सकाळी ११ ते दुपारी तीन पर्यंत दोन्ही दिशेने ब्लॉक घेण्यात आला आहे. या मार्गावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना ट्रान्स हार्बरने तसेच मुख्य मार्गावरून प्रवास करण्याची परवानगी देण्यात आली आहे. छत्रपती शिवाजी टर्मिनस ते मानखुर्द आणि नेरूळ ते पनवेल दरम्यान काही जादा गाडय़ाही चालविण्यात येणार असल्याचे रेल्वे सूत्रांनी सांगितले.

Story img Loader