रेल्वे मार्गावरील अभियांत्रिकी कामानिमित्त रविवार, ३ फेब्रुवारी रोजी सकाळी पश्चिम, मध्य आणि हार्बर रेल्वेवर मेगा ब्लॉक करण्यात येणार आहे. पश्चिम रेल्वेवर सकाळी १०.३५ ते दुपारी ३.३५ या वेळेत चर्चगेट ते मुंबई सेंट्रल दरम्यान धीम्या मार्गावर दोन्ही दिशेने ब्लॉक करण्यात येणार आहे. यामुळे काही उपनगरी गाडय़ांच्या फेऱ्या रद्द करण्यात येणार असून सर्व वाहतूक जलद मार्गावरून करण्यात येणार असल्याचे पश्चिम रेल्वेच्या सूत्रांनी सांगितले.
मध्य रेल्वेवर सकाळी ११.३० ते दुपारी ३.३० या काळात माटुंगा ते मुलुंड दरम्यान जलद मार्गावर मेगा ब्लॉक करण्यात येणार असून सर्व वाहतूक धीम्या मार्गावर वळविण्यात येणार आहे. हार्बर मार्गावर सकाळी ११ ते दुपारी तीन वाजेपर्यंत पनवेल आणि नेरूळ दरम्यान दोन्ही दिशेने ब्लॉक करण्यात येणार आहे. यामुळे पनवेल ते ठाणे या ट्रान्स हार्बर मार्गावरील त्याचप्रमाणे पनवेल ते सीएसटी दरम्यानची वाहतूक बंद राहणार आहे. ट्रान्स हार्बर मार्गावर ठाणे ते वाशी दरम्यानची वाहतूक सुरू राहणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. या काळात काही विशेष गाडय़ा चालविण्यात येणार आहेत.

आज रात्री प.रे. वर  साडेसहा तासांचा नाईट ब्लॉक
पश्चिम रेल्वेच्या नायगाव स्थानकाजवळ भुयारी मार्गाचे काम करण्यात येणार असल्यामुळे शनिवार २ फेब्रुवारी रोजी रात्री ११.५५ ते ३ फेब्रुवारी रोजी सकाळी ६.२५ या वेळेत रात्रीचा विशेष ब्लॉक घेण्यात आला आहे. यामुळे दोन उपनगरी फेऱ्या रद्द करण्यात आल्या आहेत. यावेळेत सर्व वाहतूक १० ते १५ मिनिटे उशीराने सुरू राहील, असे सूत्रांनी सांगितले.

Story img Loader