ठाणे आणि दिवा या स्थानकांदरम्यान पाचव्या आणि सहाव्या मार्गिकेच्या बांधकामासाठी मध्य रेल्वेवर या दोन स्थानकांदरम्यान दहा दिवस विशेष ब्लॉक घेण्यात आले आहेत. ३० डिसेंबर ते ९ जानेवारी या दरम्यान हे ब्लॉक्स सकाळी आणि दुपारी अशा दोन वेळी १५-१५ मिनिटांसाठी घेतले जातील. यामुळे एक फेरी रद्द करण्यात येणार असून नऊ गाडय़ा जलद मार्गावरून वळवण्यात येणार आहेत.
ठाणे आणि दिवा या स्थानकांदरम्यान पाचव्या आणि सहाव्या मार्गिकेसाठी बोगदा बांधणे आवश्यक आहे. या कामासाठी हे विशेष ब्लॉक घेण्यात येणार आहेत. पहिला ब्लॉक सकाळी ११.३५ ते ११.५० तर दुसरा दुपारी ३.०० ते ३.१५ या वेळेत घेण्यात येतील. या वेळी अप आणि डाऊन धीम्या मार्गावरील वाहतूक बंद राहील.
या अभियांत्रिकी कामामुळे मुंबई छत्रपती शिवाजी टर्मिनसहून सकाळी १०.३३, १०.४३ आणि २.०१ वाजता सुटणाऱ्या कल्याण लोकल आणि सकाळी ११.०० व २.०९ वाजता सुटणाऱ्या टिटवाळा लोकल ठाण्यापासून डाउन जलद मार्गावरून चालवण्यात येतील. या गाडय़ा मुंब्रा व कळवा या स्थानकांवर थांबणार नाहीत. तसेच टिटवाळ्यावरून ११.०८ वाजता, बदलापूरहून ११.२२ वाजता, कल्याणहून ११.२५ आणि २.४३ वाजता आणि अंबरनाथहून २.३९ वाजता मुंबईकडे येणाऱ्या गाडय़ा दिवा ते ठाणे या दरम्यान जलद मार्गावरून चालवल्या जातील. १२.५९ वाजता डोंबिवली-सीएसटी लोकल २.०५ ची सीएसटी-डोंबिवली लोकल रद्द करण्यात येणार आहे.

Story img Loader