मुंबई : विविध तांत्रिक कामांसाठी येत्या रविवारी मध्य रेल्वेच्या माटुंगा-मुलुंड दोन्ही जलद मार्गांवर मेगाब्लाॅक घेण्यात येणार आहे. तर सीएसएमटी-चुनाभट्टी, वांद्रे दोन्ही मार्गांवर, पश्चिम रेल्वेच्या चर्चगेट-मुंबई सेन्ट्रलदरम्यानही अप-़डाऊन धीम्या मार्गांवर मेगाब्लाॅक आहे. तिन्ही मार्गांवर असलेल्या मेगाब्लॉकमुळे गरज असेल तरच प्रवास करा, अन्यथा प्रवास टाळा, असे आवाहन रेल्वे प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
मध्य रेल्वेच्या माटुंगा-मुलुंड अप आणि डाऊन जलद मार्गांवर सकाळी ११.०५ ते दुपारी ३.५५ पर्यंत मेगाब्लाॅक आहे. त्यामुळे सीएसएमटी येथून सकाळी १०.२५ ते दुपारी ३.३५ पर्यंत सुटणाऱ्या डाऊन जलद मार्गावरील लोकल माटुंगा आणि मुलुंडदरम्यान डाऊन धीम्या मार्गावर वळवण्यात येणार आहेत. ठाण्याच्या पुढे जलद असलेल्या लोकल मुलुंड येथून जलद मार्गावर धावतील.
हेही वाचा:मुंबई: म्हाडाच्या संक्रमण शिबिरार्थींच्या रखडलेल्या बायोमेट्रिक सर्वेक्षणाला अखेर सुरुवात
ठाणे येथून सकाळी १०.५० ते दुपारी ३.४६ वाजेपर्यंत अप जलद लोकल मुलुंड आणि माटुंग्यादरम्यान अप धीम्या मार्गावर चालवण्यात येणार आहेत. हार्बर मार्गावरही सीएसएमटी-चुनाभट्टी, वांद्रे अप आणि डाऊन मार्गावर सकाळी ११.१० ते दुपारी ४.४० पर्यंत मेगाब्लाॅक आहे. ब्लाॅककाळात सीएसएमटी, वडाळा रोड येथून सकाळी ११.१६ ते दुपारी ४.४७ पर्यंत वाशी, बेलापूर, पनवेलसाठी तसेच सीएसएमटी येथून सकाळी १०.४८ ते दुपारी ४.४५ वाजेपर्यंत वांद्रे, गोरेगावसाठी सुटणाऱ्या हार्बर मार्गावरील लोकल रद्द करण्यात आल्या आहेत.
याशिवाय पनवेल, बेलापूर, वाशी-सीएसएमटी दरम्यानच्या लोकल सकाळी ९.५३ ते दुपारी ३.२० पर्यंत आणि गोरेगाव, वांद्रे ते सीएसएमटीदरम्यानच्या सकाळी १०.४५ ते सायंकाळी ५.१३ या काळातील लोकल फेऱ्या रद्द करण्यात आल्याची माहिती मध्य रेल्वेने दिली. ब्लॉक कालावधीत पनवेल ते कुर्लादरम्यान विशेष लोकल चालवल्या जातील.पश्चिम रेल्वेवरही रविवारी चर्चगेट-मुंबई सेन्ट्रलदरम्यान दोन्ही धीम्या मार्गांवर सकाळी १०.३५ ते दुपारी ३.३५ वाजेपर्यंत मेगाब्लाॅक आहे. धीम्या मार्गावरील लोकल ब्लाॅककाळात चर्चगेट-मुंबई सेन्ट्रलदरम्यान जलद मार्गावर चालवण्यात येतील.