मुंबई : मध्य, पश्चिम रेल्वेवरील रेल्वे रूळ, ओव्हर हेड वायर, सिग्नल यंत्रणेची देखभाल दुरुस्ती करण्यासाठी रविवारी ब्लॉक घेण्यात येणार आहे. या ब्लॉकमुळे अनेक लोकल फेऱ्या रद्द करण्यात येणार आहेत. तर, ब्लॉक कालावधीत सीएसएमटी – वाशीदरम्यान विशेष लोकल धावतील.
मध्य रेल्वे
कुठे? : ठाणे – कल्याण अप आणि डाऊन जलद मार्गावर सकाळी १०.४० ते दुपारी ३.४०.
परिणाम : सीएसएमटी येथून सकाळी ९.३० ते दुपारी २.४५ या वेळेत सुटणाऱ्या डाऊन जलद लोकल ठाणे-कल्याण स्थानकांदरम्यान डाऊन धीम्या मार्गावर वळवण्यात येतील. या लोकल नियोजित थांब्यासह कळवा, मुंब्रा व दिवा स्थानकांवर थांबतील. कल्याण येथून सकाळी १०.२८ ते दुपारी ३.२५ पर्यंत सुटणाऱ्या अप जलद लोकल कल्याण व ठाणे स्थानकांदरम्यान अप धीम्या मार्गावर वळवण्यात येतील. या लोकल नियोजित थांब्यासह दिवा, मुंब्रा आणि कळवा स्थानकांवर थांबून पुन्हा अप जलद मार्गावर वळवण्यात येतील.
हार्बर रेल्वे
कुठे? : पनवेल – वाशी अप आणि डाऊन मार्गावर (बेलापूर / नेरुळ – खारकोपर मार्ग वगळून) सकाळी ११.०५ ते दुपारी ४.०५.
परिणाम : सकाळी १०.३३ ते दुपारी ३.४९ वाजेपर्यंत पनवेल- सीएसएमटी अप लोकल आणि सकाळी ९.४५ ते दुपारी ३.१२ वाजेपर्यंत सीएसएमटी- पनवेल / बेलापूर डाऊन लोकल हार्बर मार्गावरील सेवा रद्द करण्यात येणार आहेत. सकाळी ११.०२ ते दुपारी ३.५३ वाजेपर्यंत पनवेल- ठाणे अप ट्रान्सहार्बर मार्गावरील सेवा आणि सकाळी १०.०१ ते दुपारी ३.२० वाजेपर्यंत ठाणे- पनवेल डाऊन ट्रान्सहार्बर मार्गावरील सेवा रद्द करण्यात येणार आहेत. ब्लॉक कालावधीत सीएसएमटी- वाशी दरम्यान विशेष लोकल धावतील. ठाणे- वाशी/ नेरुळ स्थानकांदरम्यान ट्रान्सहार्बर मार्गावर लोकल सुरू असतील. बेलापूर – खारकोपर आणि नेरुळ – खारकोपरदरम्यान लोकल सुरू असतील.
पश्चिम रेल्वे
कुठे ? : चर्चगेट – मुंबई सेंट्रल अप आणि डाऊन धीम्या मार्गावर सकाळी १०.३५ ते दुपारी ३.३५.
परिणाम : ब्लॉक कालावधीत चर्चगेट- मुंबई सेंट्रल स्थानकांदरम्यान सर्व धिम्या लोकल जलद मार्गावर चालवण्यात येतील. या ब्लॉकमुळे अप आणि डाऊन दिशेच्या काही लोकल रद्द करण्यात येणार आहेत.