मुंबई : मध्य, हार्बर रेल्वेवरील रेल्वे रूळ, ओव्हर हेड वायर, सिग्नल यंत्रणा यांची देखभाल, दुरुस्तीसाठी रविवारी दिवसकालीन मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. तर, पश्चिम रेल्वेवर शनिवारी रात्रकालीन ब्लॉक घेण्यात येणार असून रविवारी दिवसा कोणताही ब्लॉक नसेल. मध्य रेल्वेच्या विद्याविहार – ठाणे दरम्यान पाचव्या आणि सहाव्या मार्गिकेवर सकाळी ११ ते दुपारी ३.३० वाजेपर्यंत ब्लॉक असेल. या कालावधीत एलटीटीवरून सुटणाऱ्या / पोहचणाऱ्या डाऊन आणि अप मेल / एक्स्प्रेस ठाणे आणि विद्याविहारदरम्यान डाऊन आणि अप जलद मार्गावर वळवण्यात येतील आणि निर्धारित वेळेपेक्षा १० ते १५ मिनिटे उशिरा पोहोचतील.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हार्बर मार्गिकेवरील सीएसएमटी – चुनाभट्टी/वांद्रे सकाळी ११.१० ते दुपारी ४.४० पर्यंत अप आणि डाऊन सेवा रद्द असतील. सीएसएमटी / वडाळा रोड येथून सकाळी ११.१६ ते दुपारी ४.४७ यादरम्यान वाशी / बेलापूर / पनवेलसाठी सुटणारी डाऊन हार्बर मार्गावरील सेवा आणि सीएसएमटी येथून सकाळी १०.४८ ते दुपारी ४.४३ वाजेपर्यंत वांद्रे / गोरेगावसाठी सुटणारी डाऊन हार्बर मार्गावरील सेवा रद्द करण्यात आल्या आहेत. पनवेल / बेलापूर / वाशी येथून सकाळी ९.५३ ते दुपारी ३.२० पर्यंत सीएसएमटीसाठी सुटणारी अप हार्बर मार्गावरील सेवा आणि गोरेगाव / वांद्रे येथून सकाळी १०.४५ ते सायंकाळी ५.१३ पर्यंत सीएसएमटीसाठी सुटणारी अप हार्बर मार्गावरील सेवा रद्द करण्यात आल्या आहेत. ब्लॉक कालावधीत पनवेल – कुर्ला दरम्यान विशेष सेवा चालवल्या जातील.

हेही वाचा >>> मैदानासाठी आरक्षित भूखंडावरील ३२ बांधकामांवर हातोडा, चेंबूरमधील जिजामाता नगरात महानगरपालिकेची कारवाई

हार्बर मार्गावरील प्रवाशांना ब्लॉक कालावधीत सकाळी १० ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत मुख्य मार्गिका आणि पश्चिम रेल्वेवरून प्रवास करण्याची परवानगी देण्यात आली आहे. पश्चिम रेल्वेवर शनिवारी मध्यरात्री १२ ते पहाटे ४ वाजेपर्यंत मुंबई सेंट्रल – माहीमदरम्यान अप आणि डाऊन जलद मार्गावर चार तासांचा ब्लॉक असेल. ब्लॉक कालावधीत मुंबई सेंट्रल ते अंधेरी / सांताक्रूझ स्थानकांदरम्यान धीम्या मार्गावर लोकल वळवण्यात येतील. तर, रविवारी दिवसकालीन कोणताही ब्लॉक नसेल.