एक्स्प्रेस वृत्त/वृत्तसंस्था
मुंबई : एकूण ९६६ कोटींच्या रोखेखरेदीमुळे प्रकाशझोतात आलेल्या मेघा इंजिनीअरिंग या कंपनीची अलीकडच्या काळातील भरभराट, देशभरातून मिळालेली कंत्राटे आणि देणग्या यांची सांगड एका ठरावीक ‘पॅटर्न’कडे अंगुलिनिर्देश करू लागली आहे. महाराष्ट्रातील ठाणे-बोरिवली भुयारी मार्ग, समृद्धी महामार्गाचे काही काम करणाऱ्या मेघा इंजिनीअरिंगप्रमाणेच म्हाडा व सिडकोची कंत्राटे मिळवणाऱ्या शिर्के कन्स्ट्रक्शनच्या रोखेखरेदीमुळेही भुवया उंचावल्या आहेत.
हैदराबादस्थित मेघा इंजिनीअरिंग अॅण्ड इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड कंपनीने ११ एप्रिल २०२३ रोजी १४० कोटींची रोखेखरेदी केली. त्यानंतर महिनाभरातच या कंपनीने ठाणे-बोरिवली दुहेरी बोगद्याच्या उभारणीचे १४४०० कोटींचे कंत्राट पटकावले. विशेष म्हणजे, या प्रकल्पाच्या तांत्रिक निविदाकारांत ही एकमेव कंपनी पात्र ठरली होती. याच प्रकल्पाच्या निविदाप्रक्रियेतून बाद करण्यात आल्याच्या विरोधात मे २०२३मध्ये लार्सन अॅण्ड टुब्रो कंपनीने एमएमआरडीएविरोधात दोन याचिका दाखल केल्या होत्या. मात्र, न्यायालयाने त्या फेटाळून लावल्या होत्या.
हेही वाचा >>> ‘हायटेक’ जगातून थेट निवडणूक रिंगणात
मेघा इंजिनीअरिंगला समृद्धी महामार्गाच्या नागपूरजवळील पॅकेज एकच्या वायफळपर्यंतच्या (जि. वर्धा) रस्ते बांधणीचेही कंत्राट मिळाले होते. या कंपनीने वन्यजीवांच्या ये-जा करण्यासाठी महामार्गावर बांधलेला उन्नत मार्ग कोसळला. मात्र, कंपनीवर कारवाई झाली नाही.
मेघा इंजिनीअरिंग ही कंपनी १९८९ साली पामिरेड्डी पिची रेड्डी यांनी स्थापन केली. २०१९ ते २०२४ या काळात कंपनीला देशभरातील अनेक महत्त्वाच्या प्रकल्पांची कामे मिळाली आहेत. त्यात महाराष्ट्रातील २६ हजार कोटींच्या कामांचाही समावेश आहे. या पाच वर्षांतच कंपनीने ९६६ कोटींचे निवडणूक रोखे खरेदी केल्याचे दिसून येते.
नफ्याच्या तुलनेत लक्षणीय रोखेखरेदी
क्रायसिलच्या अहवालानुसार ३१ सप्टेंबर २०२३ रोजी मेघा इंजिनीअरिंगकडे १.८७ लाख कोटी रुपयांची कामे होती. गत आर्थिक वर्षांत या कंपनीने १४,३४१ कोटींचे उत्पन्न मिळवले. कर वजावटीनंतर कंपनीचा नफा १,३४५ कोटी रुपये होता. त्याआधीच्या आर्थिक वर्षांत कंपनीचा नफा १,५३२ कोटी होता, तर गेल्या चार आर्थिक वर्षांत कंपनीचा निव्वळ नफा ६,३९२ कोटी इतका नोंदवण्यात आला. त्याच्या १५ टक्के रक्कम कंपनीने रोखेखरेदीसाठी वापरली.
शिर्के कन्स्ट्रक्शनची रोखेखरेदी गृहबांधणी क्षेत्रातील बी. जी. शिर्के कन्स्ट्रक्शन या कंपनीने जानेवारी २०२३ ते २०२४ या काळात ११७ कोटींची रोखेखरेदी केली. याच काळात कंपनीला महाराष्ट्रातील अनेक मोठया प्रकल्पांची कामे मिळाली. गतवर्षी कंपनीला प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत २०४४८ सदनिका बांधण्यासाठी ४६५२ कोटींचे कंत्राट मिळाले. एप्रिल २०२३ मध्ये पुणे मुळा मुठा नदी पुनरुज्जीवन प्रकल्पाचे कामही या कंपनीने पटकावले. केंद्रीय सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयाची इमारत बांधण्याचे ८६६ कोटींचे कामही कंपनीच्या झोळीत पडले. याच कंपनीला २०२२ मध्येही म्हाडाच्या सदनिका बांधण्यासाठी १७० कोटींचे कंत्राट देण्यात आल्याचे उपलब्ध तपशिलानुसार आढळले आहे.