गाडीतील संपूर्ण तांत्रिक भाग भारतीय बनावटीतील तंत्रज्ञानाने विकसित
रेल्वे गाडीतील विद्युत उपकरणे तयार करणाऱ्या भारतीय कंपनीने लोकल गाडीतील संपूर्ण तांत्रिक भाग भारतीय बनावटीतील तंत्रज्ञानाने विकसित केला आहे. नुकतीच ही लोकल पश्चिम रेल्वेच्या विरार कारशेडमध्ये दाखल झाली असून सुरक्षेच्या चाचण्या होताच ही लोकल मुंबईकरांच्या सेवेत दाखल होणार असल्याचे पश्चिम रेल्वेच्या अधिकाऱ्याने सांगितले.
हैदराबाद येथील ‘मेधा सव्र्हर ड्राइव्ह प्रा. लिमिटेड’ या कंपनीने ‘मेधा’ लोकलमधील तंत्रज्ञान विकसित केले आहे. कंपनीच्या नावावरूनच या गाडीचे नाव ठेवण्यात आले आहे. या लोकलमध्ये अत्याधुनिक तंत्रज्ञान विकसित करण्यात आले असून यात मोटारमनला गार्ड तसेच प्रवाशांशी थेट संपर्क साधता येणारी यंत्रणा बसवण्यात आली आहे. यामुळे प्रवासादरम्यान संकटावेळी प्रवाशांना मोटरमनशी संपर्क साधता येणार आहे.
याशिवाय आपत्कालीन संपर्क प्रणाली, ध्वनीविस्तारक यंत्रेही बसवण्यात आल्याचे पश्चिम रेल्वेच्या अधिकाऱ्याने सांगितले. सध्या लोकल गाडीचा ढाचा ‘चेन्नईतील इंटिग्रल कोच फॅक्टरी’त तयार केला जातो. मात्र लोकलमधील आतील तंत्रज्ञान हे बंबार्डियर या विदेशी कंपनीचे बसवण्यात येते. मात्र नव्या लोकलमधील भारतीय बनावटीचे तंत्रज्ञान यशस्वी झाल्यास परदेशातील कंपन्यांना द्याव्या लागणाऱ्या चलनातही बचत होईल, असेही अधिकाऱ्याने सांगितले. हे तंत्रज्ञान यशस्वी झाल्यास पुढेही त्याचा वापर होणार आहे.

१ हजार १६८ आसने, ११० किमी प्रतितास वेग
या लोकल गाडीत १ हजार १६८आसने असणार असून ४ हजार ८६२ प्रवासी उभे राहू शकणार आहेत. तर या लोकलचा वेग प्रतीतास ११० किलोमीटर असणार असल्याचे अधिकाऱ्याने सांगितले. ही लोकल रेल्वेच्या ताफ्यात दाखल झाल्यानंतर उपनगरी रेल्वे प्रवाशांना मोठा दिलासा मिळेल, अशी अपेक्षा रेल्वे अधिकाऱ्यांकडून व्यक्त करण्यात येत आहे.