भाजपच्या मुंबई अध्यक्षपदी प्रकाश मेहता आणि आशीष शेलार यांच्यात स्पर्धा असून पुणे अध्यक्षपदासाठी अनिल शिरोळे किंवा गणेश बीडकर यांच्यापैकी एकाची निवड होईल. निवडणुकीच्या तोंडावर मुंबई अध्यक्ष गुजराती असावा की मराठी, या निकषावर निवड केली जाणार आहे. माजी केंद्रीय अध्यक्ष नितीन गडकरी आणि ज्येष्ठ नेते गोपीनाथ मुंडे यांच्यात पुढील दोन-चार दिवसांत चर्चा होणार असून त्यानंतर ही निवड होईल. गडकरी-मुंडे गटात समतोल राखण्यासाठी तडजोड आणि समन्वयाने ही निवड होईल.
मुंबई व पुणे शहर भाजप अध्यक्ष निवडीसाठी पक्षाचे ज्येष्ठ नेते व्ही. सतीश यांनी दादर येथील वसंत स्मृती कार्यालयात दोन्ही ठिकाणच्या ३५-४० ज्येष्ठ पदाधिकाऱ्यांची मते अजमावली. मुंबई अध्यक्षपदासाठी मेहता, शेलार, आणि अतुल भातखळकर यांच्याबरोबरच विद्यमान अध्यक्ष राज पुरोहित हेही इच्छुक असले, तरी त्यांना पुन्हा संधी मिळण्याची शक्यता जवळपास नाही. मेहता आणि शेलार यांच्यातच खरी लढत आहे.
मेहता २००४ मध्ये मुंबई अध्यक्ष होते. अनेक वर्षे आमदार म्हणून निवडून आलेले मेहता पक्षाचे ज्येष्ठ नेते आहेत. गुजराती समाजातील मेहता हे निवडणुकीसाठी पक्षाला आवश्यक असलेल्या निधी, साधनसामग्री आणि कार्यकर्त्यांचे बळ मिळवून देण्यासाठी अधिक उपयोगी पडतील. ते मुंडेसमर्थक असल्याने त्यांचे पारडे अधिक जड आहे. आशीष शेलार यांना नुकतीच आमदारकी मिळाली असून मेहतांच्या तुलनेत ते तरूण आहेत. ते गडकरी गटातील असले तरी त्यांनी मुंडे यांच्याशीही चांगले संबंध ठेवले आहेत. भातखळकर हे पक्षाचे जुने पदाधिकारी असून त्यांच्या नावाबाबतही विचार सुरू आहे.
अध्यक्ष निवडीसाठी गडकरी आणि मुंडे या दोघांशी चर्चा झाल्यावर निवडीवर शिक्कामोर्तब होणार आहे. प्रदेशाध्यक्षपदासाठी देवेंद्र फडणवीस यांच्यासाठी मुंडे अडून बसल्याने बराच तिढा निर्माण झाला आणि फडणवीस यांची नियुक्ती झाली. आता मुंबई अध्यक्ष मुंडे यांच्या पसंतीचा झाल्यास पुणे अध्यक्षपदासाठी गडकरी गटातील नेत्याला पसंती मिळू शकते. कोणासाठीही प्रतिष्ठेचा विषय न करता समन्वयाने निवड केली जाण्याची शक्यता आहे. नवीन अध्यक्षांची निवड आठवडाभरात होईल, अशी माहिती फडणवीस यांनी दिली.
भाजपचे यूपीएला आव्हान
केंद्रातील यूपीए सरकार सर्व आघाडय़ांवर अपयशी ठरल्याने त्यांना सत्तेत राहण्याचा अधिकार नाही. गेल्या नऊ वर्षांत देश लुटण्याचे काम यूपीएने केले असून स्वत:चे अपयश मान्य करण्याऐवजी भाजप आणि एनडीएला दोष दिला जात आहे. हास्यास्पद युक्तिवाद करण्याऐवजी हिंमत असेल तर काँग्रेसने ताबडतोब लोकसभेच्या निवडणुका घ्याव्यात, असे आव्हान शुक्रवारी भाजपने दिले. मनमोहन सिंह यांच्या हाती अटलबिहारी वाजपेयी यांनी भरलेला ग्लास दिला होता, तो यूपीए सरकाने रिकामा केल्याचे राष्ट्रीय प्रवक्ते प्रकाश जावडेकर यांनी स्पष्ट केले.

Story img Loader